सावधान! बाजारात कॅल्शियमच्या बनावट टॅबलेट, काळाचौकीतून ७५ हजारांचा साठा जप्त

तुम्ही खरेदी केलेली कॅल्सिमॅक्स ५०० टॅबलेट बनावट असू शकते. बाजारात सध्या कॅल्सिमॅक्स ५०० च्या बनावट टॅबलेटची विक्री होत असून अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)ने नुकत्याच केलेल्या कारवाईतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

सावधान! बाजारात कॅल्शियमच्या बनावट टॅबलेट, काळाचौकीतून ७५ हजारांचा साठा जप्त
SHARES

रूग्णांनो हाडांच्या वाढीसाठी, हाडांच्या विकारासाठी तुम्ही कॅल्सिमॅक्स ५०० ही टॅबलेट वापरत असाल, तर सावधान. कारण तुम्ही खरेदी केलेली कॅल्सिमॅक्स ५०० टॅबलेट बनावट असू शकते. बाजारात सध्या कॅल्सिमॅक्स ५०० च्या बनावट टॅबलेटची विक्री होत असून अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)ने नुकत्याच केलेल्या कारवाईतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

'एफडीए'च्या अधिकाऱ्यांनी काळाचौकी येथील एका फार्मा कंपनीवर छापा टाकत ७५ हजार रुपये किंमतीच्या बनावट कॅल्सिमॅक्स ५०० टॅबलेट जप्त केल्या आहेत. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.


कशी झाली कारवाई?

'एफडीए'च्या गुप्तवार्ता विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, 'एफडीए'च्या अधिकाऱ्यांनी २ फेब्रुवारीला काळाचौकी येथील मे. कैलाश फार्मा पेढीवर छापा टाकला. यावेळी तिथं कॅल्सिमॅक्स ५०० टॅबलेटचा बनावट साठा आढळल्यानं अधिकाऱ्यांनी हा साठा त्वरीत जप्त केला आहे. 'एफडीए'ने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत कॅल्सिमॅक्स ५०० टॅबलेटचा मुंबईतील खप कमी झाल्याची तक्रार मे. मेयर आॅरगॅनिक प्रा. लि. या उत्पादकाने केली होती. कॅल्सिमॅक्स ५०० च्या बनावट टॅबलेटची विक्री बाजारात होत असावी आणि त्यामुळेच खप कमी झाल्याची शंकाही उत्पादकाने व्यक्त केली होती.



तपासणीत उघड

त्यानुसार 'एफडीए'ने या प्रकरणाचा तपास करत मे. कैलाश फार्मा या घाऊक विक्रेत्याच्या पेढीवर छापा टाकला आणि मे. मेयर आॅरगेनिकची शंका खरी ठरली. मे. कैलाश फार्माकडे असलेल्या या टॅबलेटची बारकाईनं तपासणी केली असता हा साठा बनावट असल्याचं स्पष्ट झालं.

त्यानुसार एफडीए अधिकाऱ्यांनी त्वरीत ७५ हजारांचा बनावट साठा जप्त केला. या औषधांची मुंबईतील विविध ठिकाणी विक्री झाल्याचा संशय असल्यानं त्या अनुषंगानं तपासणी करत सानपाडा येथून २० हजारांचा साठाही ताब्यात घेतला आहे. तर मुंबईसह राज्यभर या टॅबलेटचा बनावट साठा आहे का? यादृष्टीनं तपासणी सुरू आहे.


म्हणून घ्या काळजी...

याप्रकरणी मे. कैलाश फार्माचे भागीदार संजय कांतीलाल राठोड, दिलीप कांतीलाल राठोड, बिट्टू उर्फ विरल चंद्रेश शहा आणि इतर संबंधित अज्ञातांविरोधात काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा नोंदवण्यात आलेल्यांमध्ये दिलीप कांतीलाल राठोडचा समावेश असून पोलिसही पुढील तपास करत आहेत. तर टॅबलेटचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तेव्हा रुग्णांनो कॅल्सिमॅक्स ५०० टॅबलेट खरेदी करताना काळजी घ्या, टॅबलेटवरील सर्व माहिती वाचा आणि मगच टॅबलेट खरेदी करा.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा