तपासणीत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे उघडकीस आल्यानंतर, महाराष्ट्र (maharashtra) अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील तीन सुप्रसिद्ध रेस्टॉरंट्स (restaurants) शालिमार, नूर मोहम्मदी हॉटेल आणि रेहमानिया रेस्टॉरंट यांचे अन्न व्यवसाय परवाने (licence) निलंबित केले आहेत.
अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यांतर्गत अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्यासाठी नोटीस बजावून आणि वेळ देऊनही, या आस्थापनांनी त्रुटी दूर करण्यात कथितपणे अपयश आल्याने ही कारवाई करण्यात आली.
भेंडी बाजार येथील शालिमार हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. चा परवाना 14 जुलै रोजी निलंबित (suspend) करण्यात आला, कारण एप्रिलमध्ये झालेल्या तपासणीत आढळलेल्या अनेक त्रुटींचे निराकरण झालेले नसल्याचे पाठपुरावा तपासणीत आढळून आले.
एफडीएने म्हटले आहे की, यामध्ये स्वयंपाकघरातील अस्वच्छ परिस्थिती, कच्चा माल आणि खाद्यतेलाच्या गुणवत्तेशी संबंधित अनिवार्य नोंदींचा अभाव, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी करण्यात आलेले अपयश, शाकाहारी आणि मांसाहारी अन्नाची अपुरी विभागणी आणि कीटक प्रतिबंधक उपायांचा अभाव यांचा समावेश आहे.
नूर मोहम्मदी हॉटेलदेखील अस्वच्छ परिस्थितीत कार्यरत असल्याचे आढळून आले.
एफडीएच्या म्हणण्यानुसार, निरीक्षकांना स्वयंपाकघरातील तेलकट फरश्या, उखडलेला रंग, अयोग्यरित्या साठवलेला कच्चा माल, अस्वच्छ भांडी, अन्न तयार करण्याच्या जागेत कीटक आणि पक्ष्यांना आत येऊ देणाऱ्या उघड्या खिडक्या, अपुरे कीटक नियंत्रण आणि पुरवठादारांच्या नोंदींचा अभाव आढळून आला.
अन्न साठवण्याच्या निकृष्ट पद्धती, गंजलेली उपकरणे, उखडलेल्या भिंती, कीटकरोधक दरवाजांचा अभाव आणि अनिवार्य अन्न सुरक्षा व पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेच्या नोंदींची अनुपस्थिती या बाबींचा अहवाल दिल्यानंतर उमरखाडी येथील रेहमानिया रेस्टॉरंटचा परवाना निलंबित करण्यात आला.
एफडीएने म्हटले आहे की, जोपर्यंत संबंधित आस्थापना अन्न सुरक्षा नियमांचे पूर्णपणे पालन करत नाहीत आणि आढळलेल्या सर्व त्रुटी दूर केल्या जात नाहीत, तोपर्यंत परवाने निलंबित राहतील.
ही अंमलबजावणीची कारवाई संपूर्ण महाराष्ट्रात अन्न सुरक्षा मानके अधिक मजबूत करण्यासाठी एफडीएच्या सुरू असलेल्या मोहिमेचा एक भाग आहे आणि अलीकडच्या काळात मुंबईतील इतर खाद्य आस्थापनांवर केलेल्या अशाच प्रकारच्या कारवाईनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा