अग्निशमन दलासाठी 'बूस्टर'; ड्रोन, रोबोट्सची खरेदी

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

मुंबई अग्निशमन दलाला अधिकाधिक सक्षम बनवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रे खरेदी केली जात असून याचाच एक भाग म्हणून फायर ड्रोन व रोबोट्सची खरेदी केली जाणार आहे. या ड्रोनच्या मदतीने उत्तुंग इमारतींवर लागलेल्य आगीच्या घटनेचा सर्व्हे केला जाणार आहे, तर तळघरातील आगीची पाहणी करण्यासाठी रोबोट्सची खरेदी केली जाणार आहे.

आधुनिक प्रणालीचा समावेश

आपात्कालीन परिस्थितीमध्ये कमीत कमी वेळेत घटनास्थळी पोहोचता यावे, यासाठी जीआयएस आणि जीपीएस आधारीत व्हेईकल ट्रॅकिंग प्रणालीसह इंटिग्रेटेड कमांड व कंट्रोल प्रणाली आणि डिस्ट्रेस कॉल रिस्पॉन्स मॅनेजमेंट सिस्टीम डायल १०१ ही कार्यप्रणाली अवलंबवण्यात येणार आहे. हे काम चाचणीच्या अंतिम टप्प्यात असून ही प्रणाली लवकरच कार्यान्वित होणार असल्याची घोषणा अर्थस्ंकल्पात आयुक्त अजोय मेहता यांनी केली. अत्याधुनिक प्रणालीमुळे आपात्कालीन परिस्थितीच्यावेळी घटनास्थळी पोहोचण्यास मदत होईल. तसेच, घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाल्यास संबंधितांवर जबाबदारीही निश्चित करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अत्याधुनिक यंत्रसामग्रीची खरेदी

मुंबई अग्निशमन दलाची नवीन केंद्रे, तसेच छोट्या अग्निशमन केंद्रांची उभारणी करतानाच अत्याधुनिक यंत्र खरेदीही केली जात आहे. केंद्र उभारणीसाठी २८.९७ कोटींची तरतूद केली आहे. याशिवाय ६४ मीटर व त्यापेक्षा अधिक उंचीची टर्न टेबल लॅडरची खरेदी, जुने एरियल लॅडर बदलून ५० मीटर उंचीचे हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म, डिजिटल मोबाईल रेडिओ प्रणाली, हाय व्हॉल्युम लाँग रेंज वॉटर कम फोम मॉनिटरची खरेदी, ड्रिल टॉवर कम मल्टी युटिलिटी ट्रेनिंग सिम्युलेटर्सची खरेदी केली जात आहे.

जवानांसाठी ३० लाखांची विमा योजना

अग्निशमन दलातील जवान आणि अधिकाऱ्यांना असलेला धोका विचारात घेऊन अपघात प्रकरणी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना जोखीम पत्करण्याच्या दृष्टीने अपघात विमा योजना सुरु करण्यात येणार आहे. याचे पैसे कर्मचारी किंवा महापालिकेला विमा कंपनीला द्यावे लागणार नसून याकरता ज्या बँकेत अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन खाते असेल, ती बँक अपघात प्रकरणी ३० लाख रुपयांपर्यंतच्या रकमेची जोखीम स्वीकारणार आहे. याव्यतिरिक्त कुटुंबांवर कोणताही आर्थिक भार न देता महापालिका मृत अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या मुलांचा कालबद्ध शैक्षणिक खर्चाचा भार उचलणार आहे.


हेही वाचा

मुंबईत 'रिसायकलिंग'! ४० ठिकाणी होणार सायकल ट्रॅक

पुढील बातमी
इतर बातम्या