मुसळधार पावसामुळे दरवर्षी मुंबईत (mumbai) निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने 13 हजार कोटींचा एकात्मिक पूरनियंत्रण आराखडा तयार केला आहे.
या आराखड्यांतर्गत मुंबईत आणखी 33 ठिकाणी फ्लड गेट (flood gate) आणि पंपिंग यंत्रणा उभारली जाणार आहे. नद्या व प्रमुख नाल्यांमध्ये पाण्याची पातळी मोजणारी अत्याधुनिक सेन्सर प्रणाली बसवण्यात येणार आहे.
या प्रकल्पाच्या कामांना ऑक्टोबर 2026 पासून सुरुवात होणार आहे. ऑक्टोबर 2029 पर्यंत संपूर्ण आराखडा पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
महत्त्वाकांक्षी पूरनियंत्रण प्रकल्पाला केंद्र सरकारकडून तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. निधीसाठी प्रस्तावही केंद्राकडे पाठवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानसभेत दिली होती.
26 जुलै 2005 रोजी मुंबईत एका दिवसात तब्बल 944 मिमी पावसाची नोंद झाली होती.
या महापुरानंतर सत्यशोधन समितीच्या शिफारशीनुसार ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत पर्जन्य जलवाहिन्यांचे रुंदीकरण, खोलीकरण, आरसीसी वाहिन्या, भूमिगत नाल्यांचे पुनर्वसन आणि पम्पिंग स्टेशन उभारणीसह अनेक कामांवर हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले.
मात्र, शहरातील पाणी साचणाऱ्या ठिकाणांची संख्या अपेक्षित प्रमाणात कमी झालेली नाही.
नव्या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात माहुल आणि मोगरा पम्पिंग स्टेशनची उभारणी, तसेच मिठी नदीतील तिसऱ्या टप्प्यातील 18 फ्लड गेट, सेवा रस्ते आणि संरक्षण भिंतींची कामे हाती घेतली जाणार आहेत.
याशिवाय मुंबईतील आणखी 33 ठिकाणी फ्लड गेट व पम्पिंग यंत्रणा उभारण्यात येणार आहे. नाल्यांमध्ये कचरा जाण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी काही ठिकाणी आठ ते दहा फूट उंच संरक्षक जाळ्या बसवण्यात येतील.
तसेच शहरातील 350 पूरप्रवण ठिकाणांवर विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत. सध्या मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्या ताशी सुमारे 50 मिमी पावसाचा निचरा करण्याच्या क्षमतेच्या आहेत.
नव्या आराखड्याद्वारे ही क्षमता 100 ते 120 मिमी पावसापर्यंत वाढविण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात पाणी साचण्याचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा आहे.
मिठी, दहिसर आणि पोईसर नद्यांसह प्रमुख नाल्यांमध्ये पाण्याची पातळी मोजणारे सेन्सर बसवले जाणार आहेत.
पाण्याची पातळी धोक्याच्या मर्यादेजवळ पोहोचताच, महापालिकेच्या (brihanmumbai municipal corporation) नियंत्रण कक्षाला तत्काळ अलर्ट मिळेल किंवा सायरनद्वारे सूचना दिली जाईल.
तसेच त्यामुळे आपत्कालीन यंत्रणांना वेळेत प्रतिसाद देणे शक्य होणार आहे. सध्या मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर सात ठिकाणी ही यंत्रणा कार्यरत आहे. नव्या प्रकल्पांतर्गत तिचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला जाणार आहे.
दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जाणाऱ्या अंधेरी सबवेचाही या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. सबवेमध्ये पाणी साचू नये यासाठी तीन पाणी साठवण टाक्या उभारण्याचा प्रस्ताव आहे.
तसेच पाण्याचा निचरा जलद होण्यासाठी पर्यायी पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचाही महापालिका विचार करत आहे. त्यामुळे अंधेरी सबवे कायमस्वरूपी पूरमुक्त करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
हेही वाचा