लोकार्पणानंतर अवघ्या दोन दिवसांत फ्लोरा फाऊंटन बंद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईचा एेतिहासिक वारसा जपणाऱ्या, मुंबईच्या सौंदर्यात आणि वैभवात भर टाकणाऱ्या फ्लोरा फाऊंटनचं नुकतंच नुतनीकरण करण्यात आलं आहे. सुमारे दीड कोटी रूपये खर्च करत फ्लोरा फाऊंटनचं रूपडं पालटण्यात आलं आहे. रूपडं पालटलेल्या फ्लोरा फाऊंटनाचं २४ जानेवारीला मोठ्या थाटामाटात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मुंबई महानगर पालिकेकडून लोकार्पण करण्यात आलं. 

नव्या रूपातील फ्लोरा फाऊंटन मुंबईकरांना आकर्षित करत असतानाच लोकार्पणानंतर अवघ्या दोन दिवसांत फ्लोरा फाऊंटन बंद करण्याचा नामुष्की पालिकेवर आली आहे. फ्लोरा फाऊंटनमधील कारंज्यातील पाण्याची पातळी कमी झाल्याचं लक्षात आल्यानं दुरूस्तीसाठी पालिकेनं फ्लोरा फाऊंटन बंद केलं आहे. इतका खर्च करून कामामध्ये हलगर्जीपणा झाल्याचं या निमित्तानं समोर आल्यानं आता पालिकेवर आणि कंत्राटदारावर टीकाही होत आहे.

२००७ पासून बंद

अभियांत्रिकी आणि शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेल्या फ्लोरा फाऊंटनची उभारणी १८६४ मध्ये करण्यात आली. दीडशे वर्षांहून जुन्या अशा फ्लोरा फाऊंटनंमधील कारंजे २००७ पासून बंद होते. तर फ्लोरा फाऊंटनच्या शिल्पाचंही मोठं नुकसान झालं होतं. मुंबईच्या वैभवात भर टाकणाऱ्या फ्लोरा फाऊंटनची दुरावस्था झाल्यानं पालिकेनं फ्लोरा फाऊंटनच्या दुरूस्ती-नूतनीकरणाचं काम हाती घेतलं. त्यानुसार २०१६ मध्ये दुरूस्ती-नूतनीकरणाच्या कामाला सुरूवात झाली.

दुरूस्ती-नूतनीकरणाचं काम हाती

दोन टप्प्यांमध्ये हे काम करण्यात आलं असून यासाठी सुमारे दीड कोटींचा खर्च करण्यात आला. पहिल्या टप्प्यात वास्तूच्या परिसराचं सुशोभिकरण करण्यात आलं तर दुसऱ्या टप्प्यात फ्लोरा फाऊंटनची दुरूस्ती आणि नूतनीकरण करण्यात आलं. पहिल्या टप्प्टातील कामासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली होती. तर दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अॅण्ड कल्चरल हेरिटेजची नियुक्ती करण्यात आली होती.

कामात हलगर्जीपणा?

दरम्यान २४ जानेवारीला लोकापर्ण झाल्यानंतर २६ आणि २७ जानेवारीला दोन दिवस कारंजी व्यवस्थितरित्या कार्यरत होती. तर मुंबईकरही या कारंज्यांकडे आकर्षित होत होते. मात्र त्यानंतर कारंज्यातील पाणी कमी झाल्याचं लक्षात आलं नि पुढे पाण्याची पातळी आणखी खालावली. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता कुठे तरी लिकेज असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

बाष्पीभवनामुळे हे लिकेज होत असल्याचं म्हणत लिकेज शोधण्यासाठी अखेर दोन दिवसांतच पालिकेला फ्लोरा फाऊंटन बंद करावं लागलं आहे. तब्बल दीड कोटी रूपये या कामासाठी खर्च करण्यात आले असतानाही कामात हलगर्जीपणा दिसून आला आहे. त्यामुळे आता पालिकेच्या आणि कंत्राटदाराच्या कामाच्या गुणवत्तेवर तसंच दर्जावरही यानिमित्ताने प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.


हेही वाचा

छोटा भीम गेमद्वारे देणार स्वच्छतेचे धडे

१ फेब्रुवारीपासून टीव्ही होणार बंद!

पुढील बातमी
इतर बातम्या