एका क्लिकवर रुग्णांची माहिती! ९३६० रुग्णांना महापालिकेचे हेल्थकार्ड

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांची आणि त्यांच्यावर आजवर केलेल्या सर्व उपचारांची माहिती केवळ एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, म्हणून रुग्णालय व्यवस्थापन प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. आतापर्यंत महापालिकेच्या दवाखान्यांमधून तब्बल ९३६० रुग्णांची माहिती संकलित करून त्यांना हेल्थकार्ड देण्यात आले आहे. केवळ हेल्थकार्डवरच्या एका बारकोडच्या आधारे रुग्णाची आख्खी कुंडलीच पाहून त्याच्यावर उपचार करणं डॉक्टरांसाठी शक्य होणार आहे.

प्रायोगिक तत्वावर राबवणार योजना

महापालिकेच्या रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणालीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीला आला असता माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून याचे सादरीकरण करण्यात आले. या प्रणालीचा वापर नायर, कस्तुरबा, राजावाडी, कूपर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय या पाच रुग्णालयांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

नायर रुग्णालयात प्रणालीचा वापर

सादरीकरणादरम्यान, केईएम रुग्णालयात रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे कर्मचाऱ्यांना या प्रणालीचा अवलंब करण्यात अडचणी उदभवू नयेत, म्हणून केईएम ऐवजी नायर रुग्णालयात या प्रणालीचा वापर करण्यात येत असल्याचे विभागाने सांगितले. सध्या दवाखान्यांमध्ये याचा प्रायोगिक तत्वावर वापर करून ९३६० रुग्णांना हेल्थकार्ड देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

टोकन पद्धतीने होणार उपचार

बँकेत गेल्यानंतर पैसे काढताना अधिकाऱ्यांकडून आपल्याला टोकन दिले जाते. या टोकनच्या आधारे आपला नंबर कधी येणार हे आपल्याला समजते. त्याच पद्धतीने यापुढे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये टोकन पद्धत राबवली जाणार आहे. रुग्णांनी आपलं हेल्थकार्ड दिल्यानंतर डॉक्टरच्या भेटीसाठी त्यांना एक टोकन नंबर दिला जाणार आहे. या टोकन नंबरच्या माध्यमातून आपला नंबर कधी येणार आहे? याची माहिती रुग्णाला मिळणार आहे.

काय असेल हेल्थकार्डमध्ये?

या प्रणालीद्वारे रुग्णांची नोंदणी करून त्यांना हेल्थकार्ड दिल्यानंतर त्यात त्यांचे नाव, पत्ता, वयासह सर्व वैयक्तिक माहिती मिळेल. शिवाय यापूर्वी कोणते उपचार केलेले आहे याची माहितीही त्यात असेल. जेणेकरून डॉक्टर जेव्हा बारकोडद्वारे हे हेल्थकार्ड पाहतील, तेव्हा त्यांना यापूर्वी केलेले उपचार, वैद्यकीय चाचणी, प्रयोगशाळेत केलेले चाचणी अहवाल अशी पेशंटची हिस्ट्री मिळणार आहे. याशिवाय रुग्णांना यापूर्वी दिलेली औषधे, रुग्णाची रक्ततपासणी किंवा अन्य चाचणी केल्यास त्यांचेही अहवाल यातच दिले जाणार असल्यामुळे त्या चाचणीचे अहवाल घेऊन किंवा कागदपत्रे घेऊन फिरण्याची गरज नाही. केवळ हेल्थकार्ड खिशात ठेवून रुग्णांना फिरता येणार आहे. त्यामुळे रुग्णांची पायपीट आणि खर्ची होणारा वेळही वाचणार आहे.

हेल्थ कार्ड आधार कार्डशी होणार लिंक

रुग्णांना दिल्या जाणाऱ्या हेल्थकार्डवर रुग्णाचा फोटो लावण्यात येणार नसून हे हेल्थकार्ड रुग्णाच्या आधारकार्डशी लिंक करण्यात येणार आहे. त्यामुळे आधार कार्डमधील आणि हेल्थकार्डमधील रुग्णांच्या माहितीची सांगड घालून या प्रणालीत त्यांना सामावून घेतले असल्याचे माहिती व तंत्रज्ञान विभागाने स्पष्ट केले आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरु करण्यात येत असली तरी भविष्यात सर्वच रुग्णालयांमध्ये ते सुरु करण्यात येईल, असे यावेळी विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


हेही वाचा

नायरमध्ये डॉक्टरांनी काढला जगातला सर्वात मोठा ब्रेन ट्युमर!

पुढील बातमी
इतर बातम्या