Advertisement

नायरमध्ये डॉक्टरांनी काढला जगातला सर्वात मोठा ब्रेन ट्युमर!

त्याला आधी साधी डोकेदुखी होती...खूप वर्ष दुर्लक्ष केल्यानंतर डोकं जड झालं...डोकेदुखी वाढल्याचं निमित्त म्हणून त्याला नायरमध्ये दाखल केलं...आणि डॉक्टरांनी ऑपरेशन करून तब्बल १ किलो ८७३ ग्रॅमचा ट्युमर त्याच्या डोक्यातून काढला! जगातला सर्वात मोठा ब्रेन ट्युमर!

नायरमध्ये डॉक्टरांनी काढला जगातला सर्वात मोठा ब्रेन ट्युमर!
SHARES

त्याला आधी साधी डोकेदुखी होती...खूप वर्ष दुर्लक्ष केल्यानंतर डोकं जड झालं...डोकेदुखी वाढल्याचं निमित्त म्हणून त्याला नायरमध्ये दाखल केलं...आणि डॉक्टरांनी ऑपरेशन करून तब्बल १ किलो ८७३ ग्रॅमचा ट्युमर त्याच्या डोक्यातून काढला! जगातला सर्वात मोठा ब्रेन ट्युमर!


६ वर्ष डोक्यात वाढला ट्युमर!

ऐकायला हे भयानक वाटत असलं, विश्वास बसत नसला, तरी हा प्रकार सत्य असून तो घडलाय मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले ३१ वर्षीय संतलाल पाल यांच्या बाबतीत. गेल्या ६ वर्षांपासून पाल हा ट्युमर डोक्यात घेऊन जगत होते. प्रारंभी डोकेदुखी म्हणत त्यांनी दुर्लक्ष केलं. पण जसजसा त्रास वाढू लागला आणि त्यासोबतच डोक्याचा मागचा भाग वाढू लागला, तसतसं त्यांना याचं गांभीर्य समजू लागलं.



मेंदूला लागूनच पसरली होती गाठ!

तब्बल सहा वर्ष हा ट्युमर वागवल्यानंतर अखेर पाल नायर रूग्णालयात दाखल झाले. पण तोपर्यंत या ट्युमरनं त्यांच्या डोक्यात चांगलंच बस्तान बसवलं होतं. डॉक्टरांनी सीटीस्कॅन, मेंदूचा एमआरआय आणि ट्युमरसाठीची विशेष सीटी अॅन्जिओग्राफी केली. आणि तेव्हा लक्षात आलं की कवटीच्या हाडांमधून मिडलाईनच्या दोन्ही बाजूंना ३० बाय ३० बाय २० सेंटीमिटरची एक भलीमोठी गाठ पसरली आहे!

ही गाठ एवढी मोठी होती की त्यामुळे पाल यांच्या डोक्याला एक वेगळाच आकार आला होता. शिवाय या ट्युमरमुळे पाल यांना अंधत्वही आलं होतं. त्यामुळे पाल यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.



जटिल शस्त्रक्रियेचं होतं डॉक्टरंसमोर आव्हान

नायर हॉस्पिटलमधील न्युरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. त्रिमुर्ती नाडकर्णी यांच्यासमोर या जटिल शस्त्रक्रियेचं मोठं आव्हान होतं. कवटीच्या हाडामधून हा ट्युमर पसरला होता. डोक्याचा आकार बदलला होता. महत्त्वाचं म्हणजे मेंदूला लागूनच हा ट्युमर होता. डोक्यातल्या अनेक रक्तवाहिन्या या ट्युमरमध्ये अडकल्या होत्या. पण डॉ. त्रिमुर्ती नाडकर्णी यांच्या टीमनं हे आव्हान यशस्वीरीत्या पेललं.


१ किलो ८७३ ग्रॅमचा ट्युमर!

तब्बल सात तास ही शस्त्रक्रिया चालली. या शस्त्रक्रियेदरम्यान एवढा रक्तस्त्राव झाला की रूग्णाला ११ युनिट रक्त चढवावं लागलं. ट्युमर काढल्यानंतर त्याचं वजन केलं, तेव्हा ते १ किलो ८७३ ग्रॅम इतकं भरलं. याआधी ब्रेन ट्युमरचं वजन १.४ किलो होतं. त्यामुळे हा जगातला सर्वाधित वजनाचा ट्युमर ठरला आहे.



अशा कठीण शस्त्रक्रियांमध्ये रुग्णाचा जीव जाण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रशिक्षित डॉक्टर्स असणं गरजेचं असतं. पण आम्ही त्यांना वाचवणं हीच मोठी गोष्ट आहे. शस्त्रक्रियेनंतर तीन दिवस संतलाल व्हेंटिलेटरवर होते. आता त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली आहे.

डॉ. त्रिमुर्ती डी. नाडकर्णी, न्‍युरोसर्जरी प्रमुख, नायर



हेही वाचा

आता नायर रुग्णालयातही नवजात बालकांसाठी मातृदुग्ध पेढी


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा