दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील बुधवारी ध्वनिप्रदूषण जनजागृती दिवस साजरा केला जातो. यावर्षी कान, नाक, घसा तज्ज्ञांच्या संघटनेमार्फत २५ एप्रिल रोजी हा दिवस साजरा करण्यात येणार असून त्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'नो हाँकींग डे' बोधचिन्हाचं अनावरण आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आलं.
आरोग्यावर होणारे अपव्यय टाळण्यासाठी अनावश्यक कर्णकर्कश्श हॉर्न वाजवू नका, असं आवाहनही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी केलं.
यावेळी आरोग्यमंत्री आणि उपस्थितांनी मुंबई शहर ध्वनी प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रतिज्ञा घेतली. अनावश्यक तसंच कर्णकर्कश्श हॉर्न वाजवू नये, तसं केल्यास त्याचा विपरित परिणाम मानवाच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे सर्वांनी ध्वनिप्रदूषण मुक्ततेच्या उपक्रमात सहभागी व्हावं, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
ध्वनी प्रदूषणामुळे मानवी शरीरावर वाईट परिणाम होत असून चिडचिडेपणा, बहिरेपणा, उच्च रक्तदाब, ह्दयविकार यासारखे आजार उद्भवतात. विशेषत: लहान मुले आणि गर्भवती महिलांना ध्वनी प्रदूषणाचा परिणाम होतो. हे सर्व टाळण्यासाठी मुंबई शहरात जनजागृती करण्यासाठी नो हाँकींग डे साजरा करण्यात येत आहे.
यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजय डोईफोडे, डॉ. कौशल सेठ, डॉ. योगेश दाभोळकर, डॉ. अदीप शेट्टी आदी उपस्थित होते.
हेही वाचा-
पंतप्रधानांनी 'कशी' केली डाॅक्टरांची बदनामी?
६ महिन्यांत २० बोगस डॉक्टरांवर कारवाई