गणेशोत्सवात ठाण्यात अवजड वाहनांना बंदी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात अवजड आणि आकाराने मोठ्या वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात आणि वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी ठाणे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम 115 आणि 116(1) अंतर्गत हे निर्बंध लागू केले आहेत.

यंदा गणेशोत्सव 14 ते 25 सप्टेंबरदरम्यान साजरा होणार आहे. दीड दिवस, पाच दिवस, गौरी-गणपती, सात दिवस आणि अनंत चतुर्दशीच्या विसर्जनावेळी मोठ्या प्रमाणात मिरवणुका निघणार आहेत.

'या' दिवशी अवजड वाहनांना बंदी

ठाणे शहर वाहतूक विभागाच्या हद्दीतील रस्त्यांवर खालील दिवशी अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही—

  • 15 सप्टेंबर – रात्री 12.01 वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत

  • 18 सप्टेंबर – रात्री 12.01 वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत

  • 19 सप्टेंबर – रात्री 12.01 वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत

  • 20 सप्टेंबर – रात्री 12.01 वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत

  • 25 सप्टेंबर, अनंत चतुर्दशी – रात्री 12.01 वाजल्यापासून 26 सप्टेंबर सकाळी 6 वाजेपर्यंत

ठाणे हे महत्त्वाचे वाहतूक केंद्र असून शहरातून तीन राष्ट्रीय महामार्ग आणि एक राज्य महामार्ग जातो. त्यामुळे इतर राज्यांतून ये-जा करणाऱ्या मोठ्या संख्येने अवजड वाहनांमुळे गणेशोत्सवादरम्यान वाहतुकीवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे.

मात्र 14 ते 25 सप्टेंबरदरम्यान विसर्जनाच्या दिवसांव्यतिरिक्त इतर दिवशी, अवजड वाहनांना रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वाहतुकीची परवानगी असेल.

वाहतूक सुरळीत राहावी आणि गणेश विसर्जन मिरवणुका तसेच भाविकांची ये-जा कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावी, यासाठी हे निर्बंध प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लागू करण्यात आल्याचे वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले.


हेही वाचा

इस्कॉनच्या 3 खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवर एफडीएची कारवाई

पुढील बातमी
इतर बातम्या