मुंबईसह ठाणे, रायगडला पुढील दोन दिवस यलो अलर्ट

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे आणि रायगडला यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाचा अंदाज दररोज सकाळी 8.30 वाजल्यापासून पुढील 24 तासांसाठी लागू असणार आहे.

मुंबईत मंगळवार-बुधवारी जोरदार पावसाची शक्यता

मुंबईत मंगळवार आणि बुधवारी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, दोन्ही दिवस पावसाची शक्यता 'व्हेरी लायकली' म्हणजेच अत्यंत जास्त आहे.

गुरुवार ते शनिवार पावसाचा जोर काहीसा कमी होऊन हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. मात्र या काळातही पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

ठाणे, रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज

ठाण्यात मंगळवार आणि बुधवारी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर शनिवारपर्यंत हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

रायगडमध्ये मंगळवारी काही ठिकाणी मुसळधार, तर बुधवारी काही भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यानंतर शनिवारपर्यंत मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे.

पालघरमध्ये मंगळवार आणि बुधवारी मध्यम, तर गुरुवार ते शनिवार हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

घाट परिसरातही मुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्रातील घाट परिसरातही पावसाचा जोर राहणार आहे. पुणे आणि सातारा घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिकच्या घाट परिसरात मध्यम पाऊस, तर अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना सध्या कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

मुसळधार पावसामुळे काय धोका?

IMDने मुसळधार पावसाच्या काळात सखल आणि शहरी भागात पाणी साचणे, झाडे उन्मळून पडणे आणि जुन्या इमारती कोसळण्याचा धोका व्यक्त केला आहे.

तसंच अचानक पूर, रस्ते, रेल्वे, हवाई आणि फेरी सेवा विस्कळीत होणे, सखल रस्ते आणि पुलांवरून पाणी वाहणे, तसेच संवेदनशील भागात दरड कोसळण्याची शक्यता आहे.

कोकण किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहण्याची आणि किनारी जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

नागरिक आणि शेतकऱ्यांना खबरदारीचा सल्ला

नागरिकांनी प्रवासापूर्वी वाहतुकीची स्थिती तपासावी आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

विजांच्या कडकडाटादरम्यान झाडांखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नये. असुरक्षित इमारतींपासून दूर राहावं आणि विजांचा कडकडाट सुरू असताना विद्युत उपकरणं प्लगमधून काढून ठेवावीत.

शेतकऱ्यांनी पिकांची लवकरात लवकर काढणी करावी, काढलेलं पीक सुरक्षित ठिकाणी ठेवावं आणि शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने करावा, असा सल्ला IMDने दिला आहे.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी पुढील दोन दिवस सावध राहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


हेही वाचा

12 ऑगस्टला कनेक्टिंग लिंक 3 तास बंद

पुढील बातमी
इतर बातम्या