मुंबई (mumbai) ते अहमदाबाद काम सुरू असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात भारतात तयार केलेलं ट्रेन सेट (B28) वापरण्यात येणार आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून मंगळवारी लोकसभेत याबद्दल माहिती देण्यात आली. प्रथम सूरत ते वापी या मार्गावर बुलेट ट्रेन (bullet train) धावणार आहे. या 97 किमी लांब मार्गावर बुलेट ट्रेनची सुरूवात 2027 मध्ये होणं अपेक्षित आहे.
मुंबई-अहमदाबाद हा संपूर्ण बुलेट ट्रेन प्रकल्प 508 किमी लांब आहे. सूरत ते वापी मार्ग ऑगस्ट 2027 मध्ये सुरू होणार असल्यची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनसाठी भारतात तयार केलेला हाय स्पी़ड ट्रेनसेट वापरण्यात येणार आहे. बंगळूरूमध्ये BEML द्वारे सध्या असे दोन ट्रेन विकसित करण्यात येत आहेत.
ही बुलेट ट्रेन ताशी 280 किमी धावणार आहे.यापूर्वी बुलेट ट्रेनच्या पहिल्या टप्प्यात जपानी बनावटीची ट्रेन धावणार की स्वदेशी याबद्दल संभ्रम होता.
परंतु, मंगळवारी सादर केलेल्या अहवालात हे स्पष्ट झाले आहे की देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनच्या प्रथम टप्प्यात भारतीय बनावटीची ट्रेनच धावणार आहे.
सध्या भारतात अशा दोन ट्रेन विकसित करण्याचं काम सुरू असलं तरी शिंकान्सेनच्या 'E10 मलिका' या बुलेट ट्रेनसेटचा विकास जपानमध्ये सध्या सुरू आहे. पंरतु, ही ट्रेन कधी पूर्ण होऊन भारतात धावणार हे अद्याप स्पष्ट नाही.
भारतात तयार होत असलेल्या B28 सुरुवातीला 250 किमी वेगाने धावणार असून पुढील टप्प्यात ताशी 320 ते 350 वेग असलेल्या ट्रेन विकसित केल्या जातील अशी महिती सुद्धा यावेळी देण्यात आली.
या बुलेट ट्रेन मार्गावर ETCS लेव्हल 2ची सिग्नलिंग प्रणाली असेल, जी ताशी 250 आणि 280 किमी प्रतितास वेगाने काम करेल. त्याची निविदा आधीच देण्यात आली आहे.
जपानकडून बुलेट ट्रेन येईल, पण सध्या भारत काम स्वत:च करत आहे असेही लोकसभेत यावेळी सांगण्यात आले. 'याचे दोन फायदे होतील. यंदाच्या अर्थसंकल्पात 4,000 किलोमीटरच्या हाय स्पीड प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
यामुळे आपण स्वत: बुलेट ट्रेन तयार करण्यास सक्षम होऊ. या सर्व नव्या मार्गांवर भारतीय 'रोलिंग स्टॉक' धावणार आहे, असा आमचा विश्वास आहे,' असे रेल्वे मंत्रालयाच्या अहवालात म्हटले होते.
याऐवजी, अर्थसंकल्पात मुंबई-पुणे, पुणे-हैद्राबाद, हैद्राबाद-बंगळुरू, हैदराबाद-चेन्नई, चेन्नई-बंगळुरू, दिल्ली-वाराणसी, वाराणसी-सिलिगुरी अशे सात नव्या हाय-स्पीड रेल प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे.