सांभाळून! लॅमिनेटेड, प्लास्टिकचं आधार कार्ड होऊ शकतं हॅक

  • मुंबई लाइव्ह टीम & निलेश अहिरे
  • सिविक

ज्यांनी ज्यांनी आपलं आधार कार्ड लॅमिनेट केलं असेल किंवा प्लास्टिकचं स्मार्ट कार्ड बनवलं असेल, त्या वापरकर्त्यांनी असं आधार कार्ड कुठंही वापरू नये, कारण ते एका झटक्यात हॅक होऊ शकतं किंवा बिनकामाचं ठरू शकतं. खुद्द UIDAI नंच ही माहिती सार्वजनिक केली आहे.

काय आहे कारण?

आधार कार्ड वास्तव्याचा किंवा ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतं. त्यामुळे सर्वसामान्यांच्या दृष्टीकोनातून आधार कार्डचं महत्त्व मोठं आहे. अनेक ठिकाणी उपयोगी पडणारं आधार कार्ड खराब होऊ नये किंवा फाटू नये म्हणून म्हणून वापरकर्ते या कार्डला लॅमिनेट करून घेतात. तर काहीजण प्लास्टिकचं स्मार्ट कार्ड तयार करून ते वापरतात.

पण, असं केलं तर ते हॅक होऊ शकतं किंवा बिनकामाचं ठरू शकतं. कारण लॅमिनेशन किंवा प्लास्टिक कोटींगमुळे आधार कार्डचा क्यू आर कोड काम करणं बंद होऊ शकतो. अथवा त्यातील डेटा सहज चोरी करता येऊ शकतो.

दंड किंवा शिक्षा

त्यामुळेच आधार कार्डची निर्मिती करणाऱ्या UIDAI चे सीईओ अजय भूषण पांडे यांनी लॅमिनेशन किंवा प्लास्टिक कोटेड कार्ड ऐवजी साधं कागदावर छापलेलं कार्ड वापरण्यालाच प्राधान्य द्याव असं म्हटलं आहे. कारण असं कार्ड छापण्यासाठी सध्या ५० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत उकळण्यात येत आहेत.

लॅमिनेशनसाठी किंवा प्लास्टिक कोटींगसाठी कार्ड सोपवल्यास त्यातील क्यू आर कोडचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक असते. आधार कार्ड चुकीच्या पद्धतीने तयार केल्यास तो देखील एक गुन्हा आहे. कायद्यातील तरतूदीनुसार संबंधित व्यक्तीला त्याकरीता शिक्षा किंवा दंड होऊ शकतो, असंही पांडे यांनी स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा-

अखेर आधार सक्तीचा अडसर दूर!

पुढील बातमी
इतर बातम्या