कर्जत पनवेल रेल्वे कॉरिडॉर प्रवासाचा वेळ कमी करणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये (mumbai local) कर्जत आणि पनवेल (panvel) स्थानकांना आता थेट जोडणी मिळणार आहे.

मुंबई (mumbai) शहरी वाहतूक प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात पनवेल - कर्जत कॉरिडोरवर 2.639 किमीच्या वावरले बोगद्याचं बांधकाम सुरू आहे.

यामुळे रेल्वे प्रवास अधिक सुलभ होणार आहे. शिवाय नवीन सुरू झालेल्या नवी मुंबई विमानतळालाही (NMIA) या मार्गाने थेट जोडणी मिळणार आहे.

कर्जत (karjat) ते पनवेल रेल मार्ग एकूण 29.9 किमी लांब दुहेरी मार्ग आहे. मध्य रेल्वेवरील गर्दी कमी करून मुंबई ते नवी मुंबई व रायगड दरम्यानचं अंतर कमी करण्याच्या उद्देशाने ही मार्गिका तयार केली जात आहे.

या अंतर्गत मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदाही बांधण्यात येत आहे. सह्याद्रीच्या डोंगरांमधून हा बोगदा तयार केला जात आहे.

या दुहेरी मार्गिकेचं काम पूर्ण होताच, मुंबई उपनगरीय रेल्वेवरील भार कमी होणार आहे. दरम्यान, कर्जत- पनवेल रेल्वे मार्गावर स्थानकांचा विस्तार सुरू आहे.

हा मार्ग मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वे यांचा संयुक्त प्रकल्प आहे. या मार्गावर काम प्रगतीपथावर सुरू असून लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.

या रेल्वे मार्गावर कर्जत, चौक, मोहोपाडा, रसायनी आणि पनवेल अशी स्थानकं असणार आहेत. हा रेल्वे मार्ग सुरू होताच कर्जत ते पनवेल प्रवास अवघ्या 30 मिनिटांत होणार आहे.

कर्जत, भिवपूरी, नेरळ, खोपोलीपासून नवी मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कर्जत ते पनवेल रेल्वे प्रकल्पामध्ये 9 प्रमुख पूल, 35 छोटो पूल, 15 अंडरपास, तीन मुख्य बोगदे आणि एका रेल्वे उड्डाणपुलाचा समावेस आहे. सर्वात आधी हा प्रकल्प डिसेंबर 2025मध्ये सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली होती.

ही तारीख पुढे ढकलून मार्च 2026 करण्यात आली होती. पण, फेब्रुवारी महिना उजाडला तरी अजून बरेच काम बाकी असल्याचं दिसत आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस ही मार्गिका प्रवाशांसाठी सुरू होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

सध्या पनवेलजवळ या प्रकल्पासाठी इंटरचेंज आणि सिग्नलिंगचं काम सूरू आहे ते अंतिम टप्प्यात पोहचलं आहे.

शिवाय पनवेल स्थानकावर प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचं कामही सुरू आहे. ही मार्गिका सुरू होताच पनवेल रेल्वे स्थानक उपनगरीय रेल्वेवरील एक महत्त्वाचं इंटरचेंज बनणार आहे.


हेही वाचा

चेंबूरमध्ये मोनोरेलची तांब्याची केबल चोरीचा प्रयत्न

पश्चिम रेल्वेला ICF कडून ‘रेडीमेड’ 15 डब्यांची लोकल मिळणार

पुढील बातमी
इतर बातम्या