वसईत दरड कोसळली, 4 जणांची सुटका तर २ जण अडकून

(Representational Image)
(Representational Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वसईच्या राजवली वाघरल पाडा (Vasai Rain) या परिसरात दरड कोसळली आहे. या दरडीखाली 6 जण अडकले होते. त्यापैकी 4 जणांची सुटका करण्यात आली आहे. तर बाप-लेक असे दोघेजण अजूनही दरडीखालीच दबलेले असल्याची माहिती मिळते आहे.

वालीव पोलीस आणि वसई विरार महापालिका अग्निशमन दलाचे जवान दुर्घटनास्थळी दाखल झालेत आणि बचावकार्य सुरु आहे.

या घरात अमित सिंग (४५) पत्नी आणि २ मुलांसह राहत होते. दरम्यान, आज सकाळी साडेसातच्या सुमारास पावसामुळे चाळीवर दरड कोसळली. स्थानिकांच्या मदतीने आई वंदना सिंग (४०) आणि मुलगा ओमसिंग (१२) यांना बाहेर काढण्यात आले. अद्यापही वडील अमित सिंग आणि त्यांची मुलगी रोशनी सिंग (१६) हे ढिगाराखाली अडकले आहेत. आम्ही त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करत असून बचाव कार्य सुरू असल्याची माहिती वसई विरार अग्निशमन विभाग प्रमुख दिलीप पालव यांनी दिली

पालघर जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसापासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. यामुळे आज पहाटे पालघर तालुक्यातील सोमटा येथील परशुराम हाडळ यांचे घर कोसळले. घरासह घरातील सामग्रीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

भारतीय हवामान विभाग (IMD) आणि प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार 12 आणि 14 जुलै दरम्यान पालघर जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार (अतिवृष्टी ) पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या परिस्थितीत उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून शाळा बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी दिल्या आहेत.


हेही वाचा

मुंबईत पुढील २ ते ३ तास मुसळधार पाऊस, १४ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट

पुढील बातमी
इतर बातम्या