२८ दिवसांच्या उपचारांनंतर लतादीदी घरी परतल्या

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

प्रसिद्ध गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. लातादीदी यांना रविवारी रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रकृती बिघडल्यानं त्यांना ११ नोव्हेंबर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. लतादीदी घरी परतल्याचं ट्विट लता मंगेशकर यांनी केलं आहे.

लतादीदी घरी परतल्या

२८ दिवसांच्या उपचारांनंतर लतादीदी घरी परतल्या आहेत. 'मागील २८ दिवस मी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होते. मला न्युमोनिया झाला होता. मी पूर्णपणे बरी होऊनच घरी जावे, असे डॉक्टरांना वाटत होते. मी आज घरी आले आहे. देव, तसेच माई-बाबा यांचा आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांची प्रार्थना यामुळं मी ठीक आहे. तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार... ब्रीच कँडीमधील डॉक्टर हे देवदूतच होते. या रुग्णालयातील कर्मचारीवर्गही खूप चांगला होता', अशा शब्दांत लता मंगेशकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसंच, डॉ. प्रतीत समदानी, डॉ. अश्विनी मेहता, डॉ. झरीर उदवाडीया, डॉ. निशित शाह, डॉ. जनार्दन निंबोळकर आणि डॉ. राजीव शर्मा यांचे आभारही मानले आहेत.

डॉक्टरांना शुभेच्छा

लता मंगेशकर यांच्या अधिकृत अकाऊंटवरून त्या घरी परतल्याची माहिती जाहीर झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनीही त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. लतादीदी रुग्णालयात दाखल असताना त्यांच्या प्रकृतीबद्दल अनेक अफवा पसरत होत्या. १४ नोव्हेंबरला त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लता मंगेशकर यांची रुग्णालयात जाऊन चौकशी केली होती.


हेही वाचा -

पेटीएमने देशभरात उभारले ७५० फास्टॅग विक्री केंद्र

'इथं' मिळतं १० रुपयात जेवण


पुढील बातमी
इतर बातम्या