'इथं' मिळतं १० रुपयात जेवण

आम्ही तुमची ओळख अशा अवलियांशी करून देणार आहोत ज्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता राजकीय पक्षांच्या आधीच १० रुपयात जेवण देत आहेत. त्यांचा हा उपक्रम अनेक भूकेल्यांची पोटाची आग शमवत आहे.

  • 'इथं' मिळतं १० रुपयात जेवण
  • 'इथं' मिळतं १० रुपयात जेवण
  • 'इथं' मिळतं १० रुपयात जेवण
SHARE

विधानसभा निवडणुकी दरम्यान शिवसेनेनं त्यांच्या वचननाम्यात १० रुपयात थाळी देणार असं वचन दिलं होतं. त्यानंतर महाविकासआघाडीच्या वचननाम्यात देखील १० रुपयात जेवण देण्यात येईल, हे नमूद करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं केलेली ही घोषणा कधी पूर्ण होईल हे कुणालाच माहित नाही. पण आम्ही तुमची ओळख अशा अवलियांशी करून देणार आहोत ज्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता राजकीय पक्षांच्या आधीच १० रुपयात जेवण देत आहेत

महागाईतही १० रुपयात जेवण

दिवसेंदिवस वाढती महागाई पाहता १० रुपयात जेवण देणं तसं कठीणच आहे. हल्ली १० रुपयात साधा वडापाव येत नाही, मग १० रुपयात जेवण कसं मिळणार? हा एक मोठाच प्रश्न आहे. पण इच्छाशक्ती असेल तर काही ही करता येऊ शकतं, याचा प्रत्यय आला तो कल्याणमध्ये. कल्याणमध्ये एका अवलियानं गोरगरीबांसाठी १० रुपयात जेवण ही योजना सुरू केली. या अवलियाचं नाव आहे अविनाशचंद्र गुप्ता.


गरिबांसाठीचा संकल्प

कल्याण पश्चिम स्थानक परिसरात ओम कृपा सोसायटीमध्ये राहणारे अविनाशचंद्र गुप्ता यांचा ज्वेलरी आणि कॉस्मेटिक्सचा व्यवसाय आहे. स्थानक परिसरात वावरताना रस्त्याच्या कडेला बसणारे अनेक गोरगरीब त्यांना दिसायचे. एकवेळच्या जेवणाची देखील यांची भ्रांती असायची. त्यामुळे अनेकदा त्यांना भूकेनं व्याकूळ झालेलं अविनाशचंद्र यांनी पाहिलं आहे. या गरीबांसाठीच त्यांनी १० रुपयात पोटभर जेवण देण्याचा उपक्रम सुरू केला

समाजसेवेचं समाधान

२०१८ सालापासून त्यांनी थेट १० रुपयांत भरपेट जेवणाची सुविधा स्थानक परिसरात सुरू केली. सुरुवातीला त्यांना जागेची समस्या उद्भवू लागली. यासाठी त्यांनी एक हातगाडी विकत घेतली. १० रुपयांत भरपेट जेवण देणारी ही हातगाडी स्थानक परिसरात उभी असते. स्वत:च्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी ४० टक्के वाटा यासाठी ते खर्च करतात. आता तर गरीबच नाही तर मध्यमवर्गीय देखील त्यांच्या या गाडीवर जेवतात. आपल्याला शक्य असेल तितके दिवस हा उपक्रम आपण राबवणार असल्याचा निश्चय अविनाशचंद्र यांनी केला आहे.


ठाणेकर तरुणांचाही पुढाकार

अविनाशचंद्र गुप्ता यांचासारखाच प्रयत्न ठाण्यातल्या दोन तरूणांनी केला आहे. ठाणे परिसरातील खारटन रोड परिसरात राहणाऱ्या दिनेश मेहरोल आणि सुनील चेटोले यांनी गोरगरिबांची सेवा म्हणून ना नफा ना तोटा हा उपक्रम सुरू केला आहे. ठाण्यातल्या खारटन रोड परिसरात बाबाचा ढाबा इथं १० रुपयांत भात आणि आमटी असं जेवणं मिळतं.


कोणत्याही राजकीय फायद्यासाठी ही सेवा सुरू केली नाही. राजकीय पक्ष १० रुपयात पूर्ण थाळीचं आश्वास देत आहेत. पण आम्ही १० रुपयात फक्त भात-आमटी देत आहोत. भुकेल्यांना भोजन देऊन एकप्रकारची सेवा आम्ही करत आहोत

दिनेश मेहरोल

दिनेश सुनील यांच्या या योजनेचा शुभारंभ रविवारीच करण्यात आला. रविवारी म्हणजेच पहिल्या दिवशी २५० जणांनी तर सोमवारी ३२५ जणांनी याचा लाभ घेतला.  

फक्त गरजूंना आधार

मुलुंड, माटुंगा आणि बोरिवली इथल्या राज रोटी सेंटरमध्ये गरजूंना चक्क १० रुपयात पोटभर जेवता येतं. या सेंटरमधल्या ५ महिलांनी ही जबाबदारी उचलली आहे. मीना गोशार यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात राबवली. सध्या हे सेंटर फक्त ३ ठिकाणी सुरू आहे. पण येत्या काळात आणखी सेंटर उभारण्यात यावेत, असा त्यांचा मानस आहे.


फक्त एकच अट

१० रुपयात ६ चपात्या, एक पातळ भाजी आणि एक केळं असं पोटभर तुम्हाला खाता येईल. पण यासाठी एकच अट आहे ती म्हणजे, तुमची कमाई ७ हजाराहून कमी हवी. याशिवाय शारिरीकरित्या दुर्बल आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील ही सेवा उपलब्ध आहे.

कुठे : जवाहर टॉकीज कम्पाऊंड, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, मुलुंड (पू.)


हीच खरी 'मानवसेवा'

अंबरनाथ इथल्या मानवसेवा चॅरेटेबल ट्रस्ट तर्फे देखील गोरगरीब-गरजूंसाठी १० रुपयात थाळी दिली जाते. चपाती, भाजी, डाळ-भात आणि एक स्विट डिश असा मेन्यू इथं दिला जातो. अधिक करून कामगार वर्ग आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि रस्त्यावर राहणारे गोरगरीब इथं येऊन या योजनेचा लाभ घेतात. जवळपास ३०० ते ३५० नागरिक इथं जेवायला येतात.


हेही वाचा

ठाण्यात महिलांसाठी पहिली 'पावडर रुम'

हे आहेत मुंबईतील ७ सुपर'मॅन'

संबंधित विषय
ताज्या बातम्या