Advertisement

हे आहेत मुंबईतील ७ सुपर'मॅन'

प्रत्येक पुरुषानं स्वत:च्या परीन समाजात काही तरी बदल घडवून आणले आहेत किंवा समाजात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मुंबईतल्या अशाच ७ सुपर'मॅन्स'ची ओळख तुम्हाला करून देणार आहे. हे खऱ्या अर्थानं हिरो आहेत.

हे आहेत मुंबईतील ७ सुपर'मॅन'
SHARES

आज आंतरराष्ट्रीय पुरुष दिन आहे. आजपर्यंत स्त्रियांचं गुणगौरव सर्वत्रच होताना आपण पाहिलं आहे. प्रत्येक क्षेत्रात स्त्रीनं पुढाकार घेतला आहे. पण आज आम्ही बोलणार आहोत पुरुषांबद्दल. थोडं ऐकून विचित्र वाटत असेलच. विचित्र यासाठी की पुरुषांच्या कर्तृत्वाबद्दल तसं फारसं लिहलं जात नाही.

पण पुरुष दिनानिमित्त आम्ही तुमची ओळख अशा काही पुरुषांशी करून देणार आहोत ज्यांचा समाज प्रबोधनात मोलाचा वाटा आहे. प्रत्येक पुरुषानं स्वत:च्या परीनं समाजात काही तरी बदल घडवून आणले आहेत किंवा समाजात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मुंबईतल्या अशाच ७ सुपर 'मॅन्स'ची ओळख तुम्हाला करून देणार आहे. हे खऱ्या अर्थानं हिरो आहेत.


) दादाराव भिलोरे

दादाराव भिलोरे रस्त्त्यावरून जाताना जेव्हा खड्डा पाहतात तेव्हा तो खड्डा बुजवण्यास सुरुवात करतात. एक भरून ते दुसऱ्या खड्ड्याच्या शोधात निघतात. दुसरा खड्डा सापडला की तोही भरतात. दिवसाला एक दोन-तास खड्डे भरण्याचं काम ते करतात. ते काही पालिकेचे अधिकारी नाहीत.


पण एक सामान्य नागरिक आहेत. या खड्ड्यांमुळेच त्यांच्या मुलानं जीव गमावला. अशी वेळ दुसऱ्या कोणावर येऊ नये म्हणून त्यांनी स्वत: खड्डे भरण्याची जबाबदारी घेतली.


) रविंद्र बिरारी

रेल्वे स्थानकांवर आढळणारे मनोरुग्ण, भिकारी या वंचित घटकांकडे समाज घृणास्पद नजरेनं पाहत असतो. त्यांचे वाढलेले केस, दाढी, शरीराचा कुबट वास यामुळे त्यांच्या जवळ जाण्याचं धाडसही कुणी करत नाही. परंतु हे देखील समाजाचा एक भाग आहेत, त्यांनाही नीटनेटके दिसावे, त्यांचाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा या हेतूनं रवींद्र बिरारी हा अवलिया पुढे आला.

समाजानं नाकारलेल्या घटकांचे केस कापण्याचा आणि दाढी करण्याचा विडा उचलला आहे. बिरारी यांचे भांडूप इथं केशकर्तनालय असून गेल्या आठ वर्षांपासून तेही समाजसेवा करत आहेत.


) दिपेश टँक

रेल्वे प्रवासात मुलींची छेड काढणं, चुकीचा स्पर्श करणं किंवा त्यांना जाणूनबुजून धक्का मारणं अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. याविरोधात दिपेश टँक आणि त्याच्या नऊ मित्रांनी २०१३ साली 'वॉर अगेंस्ट रेल्वे रावडीज' एक मोहीम सुरू केली.


या मोहिमेअंतर्गत दिपेश टँक रेल्वेमध्ये किंवा रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर स्पाय गॉगल घालून वावरायचा. या स्पाय गॉगलच्या मदतीनं दिपकनं छेडछाडीच्या घटना किंवा स्टंट करणाऱ्यांना कॅमेऱ्यात कैद केलं. कॅमेऱ्याच्या फुटेजच्या मदतीनंच १५० तरुणांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.


) चिनू कवात्रा आणि अक्षय मांढरे

अन्न हे पूर्णब्रह्म असं आपण नेहमी म्हणत असतो. पण खरंच आपण अन्नाला पूर्णब्रह्म मानतो का? असं विचारायचं कारण म्हणजे भारतात आजही अन्नाची नासाडी करून त्याचा अपमान केला जातो. हे चित्र एकीकडे असताना कित्येकांना एक वेळचं जेवण देखील मिळत नाही. हाच विचार करून चिनू कवात्रा आणि अक्षय मांढरे या तरूणांनी 'रोटी घर' ही संकल्पना राबवली.


लहानग्यांच्या पोटाची आग शमवणारे अन्नदाता म्हणून आज हे दोघं ओळखले जातात. मुंबई आणि ठाण्यातल्या काही लहान मुलांच्या जेवणाची आणि शिक्षणाची जबाबदारी चिनूनं घेतली आहे.


) अबिद सुरती

८० वर्षीय आबिद सुरती राष्ट्रीय पुरस्कार विजेते असून ते लेखक, कार्टूनिस्ट आणि कलाकार आहेत. प्रत्येक रविवारी सकाळी ते मिरा रोड इथल्या अपार्टमेंटच्या प्रत्येक मजल्यावर जातात. प्रत्येकाच्या घरा-घरात जाऊन ते एकच प्रश्न विचारतात तो म्हणजे, 'तुमच्या घरात नळातून पाणी गळते का?’ जर कुणी हो उत्तर दिलं तर ते त्याच्या घरी प्लंबरला घेऊन जाऊन मोफत नळाची दुरुस्ती करून देतात


याशिवाय घरा-घरात जाऊन पाण्याचं महत्त्व देखील समजवतात. आतापर्यंत त्यांनी १० दशलक्ष लिटर पाण्याची बचत करण्यास मदत केली आहे. हे खरंच कौतुकास्पद आहे.

) धर्मेश भराई

द मॅन ऑफ वॉटरफॉल म्हणून धर्मेश बरई यांना ओळखलं जातं. धर्मेश आणि त्यांची टीम धबधबा स्वच्छता आणि संवर्धनसाठी २०१४ पासून सतत विविध स्तरावर काम करत आहे.


आतापर्यंत मुंबईजवळील एकूण ८ ड्राईव्हमध्ये १३ धबधबे स्वच्छ केले आणि ७ टन पेक्षा जास्त कचरा धबधब्याच्या परिसरातून काढून स्वच्छ केला आहे. त्यात प्लास्टिकचे रपर्स, दारूच्या बाटल्या, प्लास्टिक, थर्माकोल प्लेट्स, तुटलेल्या चपला, छत्री अशा खूप गोष्टींचा समावेश होता.

)फरोज शहा

वर्सोवा किनाऱ्याचा कायापालट करण्यासाठी अफरोज शहा हा तरूण पुढे सरसावला. कधीकाळी पायाला कचरा लागायचा तिकडे आज वाळू जाणवू लागली आहे. ऑक्टोबर २०१५ मध्ये हा किनारा स्वच्छ करण्याचा निर्धार केला आणि या किनाऱ्याला ८५ आठवड्यांनी पूर्वीचे रूप प्राप्त झाले.


अफरोज यांनी या कामात हात घातला तेव्हा त्यांच्यासोबत कोणीच नव्हते. पण सोशल नेटवर्किंगवरून याबद्दलची माहिती मिळताच अनेक हात अफरोज यांच्यासोबत जोडले गेले. दर रविवारी आता तिकडे स्वच्छता मोहीम राबवली जाते.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा