पालिकेचा निषेध करण्यासाठी लोअर परळच्या व्यापारी मंडळाचं आंदोलन, दुकानं बंद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

लोअर परळ स्थानकाच्या पश्चिमेकडील गणतपराव कदम मार्गावरील प्रो. दादासाहेब खामकर भाजी मंडई महापालिकेकडून स्थलांतर करण्यात येणार आहे. मात्र, या मंडईचं स्थलांतर होऊ नये यासाठी, तसंच पालिकेचा निषेध करण्यासाठी बुधवारी मंडईतील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक व्यापाऱ्यांनी घेतला आहे.

दुकानं बंद

लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळील ना. म. जोशी मार्गावरील वरळीकडे जाणाऱ्या पुलाची दुरुस्ती पालिका करणार आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी येथील मंडईतील दुकानदारांना जागा रिकामी करण्याचे तोंडी आदेश दिल्याचे प्रो. दादासाहेब खामकर मंडई व्यापारी मंडळाचे अध्यक्ष तुकाराम पाटील यांनी सांगितलं. मात्र, यावेळी दुरुस्तीचा कोणताही आराखडा न दाखवता सरसकट जागा खाली करण्याची सक्ती केल्यास आमच्यावर उपासमार ओढावणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळं याच परिसरात पर्यायी जागा देण्याबाबत लेखी आश्वासन द्या, अन्यथा जोरदार आंदोलन करू, अशा इशारा व्यापारी मंडळाच्या वतीनं देण्यात आला आहे.

मंडई स्थलांतर

मंडई स्थलांतर करण्याच्या पालिकेच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी परिसरातील ५०० व्यापारी कडकडीत बंद पाळणार आहेत. तसंच, या बंदला स्थानिकांनीही पाठिंबा द्यावा, असे आवाहन पाटील यांनी केलं आहे. महापालिकेच्या निषेधार्थ होणाऱ्या या आंदोलनादरम्यान परिसरातील दुकाने, फेरीवाले, मच्छी बाजार, मटन मार्केट सर्व काही बंद राहणार ठेवण्यात येणार आहे.


हेही वाचा -

बेस्ट बसमध्ये पुन्हा होणार ट्रायमॅक्स मशीनचा वापर

शिवसेनेकडून पुन्हा किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोध


पुढील बातमी
इतर बातम्या