मिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांचं त्वरित स्थलांतर करा- उद्धव ठाकरे

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मिठी नदी पात्रातील क्रांती नगर, संदेश नगर येथील बाधित झोपडपट्टीधारकांचं प्राधान्याने स्थलांतर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी दिले. विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील झोपडपट्ट्यांचं स्थलांतर करण्याबाबत वर्षा निवासस्थानी आयोजित बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले.

या बैठकीला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray), खासदार विनायक राऊत, आमदार अशोक लांडे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवास, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, १९९५ च्या कायद्यानुसार जे झोपडपट्टीधारक अपात्र होते त्यांना नियमानुसार २०११ च्या शासन निर्णयाप्रमाणे पात्र करून घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. झोपडपट्टीधारकांना स्थलांतरित करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करून येथील कामांना गती देण्यात यावी. 

कुर्ला येथील बांधकाम मोकळ्या जागेमध्ये असून या ठिकाणी १७ हजार २०० घरे आहेत. यापैकी काही घरे मोडकळीस किंवा जीर्ण झाली आहेत. तसंच मिठी नदी पात्रात काही घरे आहेत. त्यांना प्राधान्य देऊन त्यांचे स्थलांतर करून इतर ठिकाणी त्यांना घरे बांधून देण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.  



हेही वाचा- 

कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते!- उद्धव ठाकरे


पुढील बातमी
इतर बातम्या