सर्वसामान्यांना वीजदर वाढीचा शॉक, नवे दर लागू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सर्वसामान्यांना वीजदर वाढीचा फटका बसला आहे. शनिवारपासून राज्यातील वीजदरात वाढ करण्यात आली आहे. फक्त महावितरणच नाही तर इतर खाजगी वीज कंपन्यांनी देखील दरवाढ केली आहे. आयात कोळशाच्या दरात झालेली मोठी वाढ, करोनाकाळात उत्पन्नात झालेली घट, पारेषण खर्चात झालेली वाढ आणि अन्य कारणांमुळे वीज कंपन्यांचा खर्च वाढला आहे. याच कारणामुळे ही दरवाढ केली आहे.

महावितरण कंपनीच्या वीज दरात शनिवारपासून (१ एप्रिल) सरासरी तीन ते सात टक्के वाढ झाली आहे. महावितरणबरोबरच टाटा (TATA), अदानी (Adani) आणि ‘बेस्ट’च्या (BEST) वीजदरातही वाढ झाली असून, घरगुती, व्यापारी, औद्योगिक आणि कृषी अशा सर्वच संवर्गातील ग्राहकांना विजेसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

महावितरणचा (Mahavitran) १०१ ते ३०० युनिट विजेचा दर १० रुपये ८१ पैसे, तर अन्य खासगी कंपन्यांचा वीज दर हा सात ते पावणेआठ रुपये आहे. म्हणजेच महावितरणची वीज तुलनेत महाग असेल.

‘अदानी’च्या वीजदरात ११ टक्क्यांपर्यंत वाढ

अदानी कंपनीच्या घरगुती वीजग्राहकांच्या दरात यंदाच्या आर्थिक वर्षांत ११ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. महिन्याला ५०० युनिटहून अधिक वीजवापर करणाऱ्या ग्राहकांचा वीजदर आधीच्या वर्षीच्या तुलनेत किंचित कमी म्हणजे प्रति युनिट १०.८२ रुपयांवरून १०.७६ रुपये इतका करण्यात आला आहे.

अदानी कंपनीचा वीजपुरवठय़ाचा सरासरी दर यंदा प्रति युनिट ८.५७ रुपये तर पुढील वर्षी ८.७६ रुपये राहील. ही वाढ अनुक्रमे २.१८ टक्के व २.१३ टक्के आहे.

‘बेस्ट’च्या वीजदरात साडेचार ते साडेआठ टक्के वाढ

‘बेस्ट’च्या वीजदरात २०२३-२४ मध्ये घरगुती ग्राहकांसाठी साडेचार ते साडेआठ टक्के दरवाढ होणार आहे. स्थिर आकारातही वाढ करण्यात आली आहे. ‘बेस्ट’ला टाटा कंपनीकडून विजेचा पुरवठा होतो ‘बेस्ट’चा वीजपुरवठय़ाचा सरासरी दर पुढील दोन वर्षांत अनुक्रमे ९.०४ व ९.६१ रुपये प्रति युनिट इतका राहील.

टाटा कंपनीकडून पाच ते १२ टक्क्यांची वाढ

टाटा कंपनीच्या वीजदरांमध्ये दोन वर्षांत २३-३८ टक्क्यांची वाढ करण्यास आयोगाने मंजुरी दिली असून, त्यातून यंदाच्या वर्षी सुमारे ८६२ कोटी रुपयांची तूट भरून निघणार आहे. टाटा कंपनीने दरमहा ५०० युनिटहून अधिक वीज वापरणाऱ्यांचे वीजदर थोडे कमी केले आहेत.

टाटा कंपनीच्या पुढील दोन वर्षांसाठीच्या अनुक्रमे ४६८५ कोटी रुपये आणि ५५०१ कोटी रुपयांच्या वार्षिक महसूल दरपत्रकास आयोगाने मंजुरी दिली आहे. पुढील दोन वर्षे वीजपुरवठय़ाचा सरासरी दर अनुक्रमे ८.४२ आणि ९.४५ रुपये प्रति युनिट राहील.

‘बेस्ट’ महागडी वीज घेणार

दक्षिण मुंबईत वीजेचा वापर वाढत असल्याने ‘बेस्ट’ एक वर्षांसाठी सरासरी ७.५० रुपये इतक्या महागडय़ा दराने ४०० मेगावॉट वीज खरेदी करणार आहे. सुमारे दहा लाख ग्राहकांना वीज पुरविणाऱ्या बेस्टची वीजेची मागणी ९०० मेगावॉटपर्यंत असून उन्हाळय़ात वातानुकूलन यंत्रांचा वापर वाढल्यावर त्यात वाढ होते. ‘बेस्ट’ला ६५ टक्के वीज टाटा कंपनी पुरवते. पण, कोळसा व गॅस तुटवडय़ामुळे वीजेचा अपुरा पुरवठा होत असल्याने ‘बेस्ट’ ही महागडी वीज खरेदी करणार असून त्यास आयोगाने मान्यता दिली आहे.


हेही वाचा

डबेवाले जाणार सहा दिवस सुट्टीवर, 'या' तारखेपासून डबासेवा बंद

अंधेरी, बोरिवली स्थानकावर रेस्टॉरंट-ऑन-व्हील सुरू होणार

पुढील बातमी
इतर बातम्या