कर्जमाफीचा आॅनलाईन घोळ, आयटी विभागाच्या प्रधान सचिवांची उचलबांगडी?

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कर्जमाफीची घोषणा होऊन कित्येक महिने उलटले, तरी कर्जमाफीचा ऑनलाईन घोळ अजूनही कायम असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे आयटी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. गौतम यांना सध्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात अालं आहे. त्यांच्या जागी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे. शेतकरी कर्जमाफी प्रकरणातील हा पहिला बळी असल्याचं म्हटलं जात आहे.

गौतम यांची उचलबांगडी का?

शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अनेकवेळा मुदतवाढ देण्यात आली. तरीही वारंवार तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या ऑनलाईन कर्जमाफी घोळाला जबाबदार ठरवत आयटी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.

'त्या' कंत्राटांचीही चौकशी होणार

दरम्यान गौतम यांनी वरिष्ठांकडून आलेल्या सूचनेनुसार १५ दिवसांच्या रजेचा अर्ज दिला, अशी माहिती आहे. मात्र आजारी वडिलांच्या भेटीसाठी गावी जात असल्याचं गौतम यांचं म्हणणं आहे. गौतम यांच्या कार्यकाळात आॅनलाईन कर्जमाफी आणि इतर कामांसाठी आयटी विभागाकडून देण्यात आलेल्या कंत्राटांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या