Advertisement

'बहुत नाइंसाफी है'! आधार नंबर एक, लाभ मात्र शेकडो शेतकऱ्यांना!!


'बहुत नाइंसाफी है'! आधार नंबर एक, लाभ मात्र शेकडो शेतकऱ्यांना!!
SHARES

३४ हजार कोटींची कर्जमाफी करणारे देशातील पहिले राज्य असे अभिमानानं सांगणाऱ्या भाजपा सरकारचा कर्जमाफीचा अजून एक घोळ समोर आला आहे. या घोळामुळे चक्क एकाच आधार नंबर शेकडो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. आधीच कर्जमाफीच्या घोळामुळे विरोधकांच्या रडारवर असणाऱ्या सरकराची आता चांगलीच गोची झाली आहे.


बँका, आयटी विभागाची निराशाजनक कामगिरी 

आठवड्याभरापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीची दिवाळी भेटीची घोषणा सरकारने केली होती. मात्र बँका आणि आयटी विभागाच्या निराशजनक कामगिरीमुळे ही योजना मंगळवारपर्यंत सुरळीत झाली नव्हती. याचे पडसाद मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत उमटले. सुधीर मुनगंटीवार, पांडुरंग फुंडकरांसह स्वत: फडणवीस यांनीही नाराजीचा सूर लावला.

विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात ८ लाख शेतकऱ्यांना या योजनेेचा फायदा मिळणार, अशी जाहीर करण्यात आले असले तरी आता फक्त ३.५ लाख शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल, असे वास्तव समोर आले.



घोळाचे पडसाद उमटले

मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत कर्जमाफीच्या घोळाचे पडसाद उमटले. एवढी मोठी कर्जमाफी करूनही ती बँका आणि आयटी विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहचत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यासाठी भाजपा सरकारला दोषी ठरवले जात असल्याची भावना अर्थमंत्री मुंनगटीवार यांनी व्यक्त केली. पालकमंत्र्यांना शेतकरी आता जाब विचारत असून कर्जमाफी सोडाच, पण जे नियमित कर्ज भरत आहेत त्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर २५ हजारांची रक्कम जमा होत नसेल तर एवढा गाजावाजा करून योजना घोषित करण्याचे काय कारण होते, असा प्रश्न आपल्याला शेतकरी करत असल्याचे फुंडकर म्हणाले.


राज्य बँक परिषदेची तातडीची बैठक

फडणवीस आपल्या सहकाऱ्यांचे म्हणणे शांतपणे एेकत होते. त्यांनीही शेवटी एवढी माेठी योजना असूनही त्याचा अपेक्षित फायदा आपल्या सरकारला घेता आलेला नाही, असे मत व्यक्त केल्याची माहितीती सुत्रांनी दिली. घोळ संपवण्यासाठी राज्य बँक परिषदेची तातडीची बैठक बोलावण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले.

फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यात दहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची घोषणा केली हाेती. मात्र प्रमाणपत्रक वाटपावेळी गेल्या आठवड्यात हा आकडा दीड लाखांनी घटला आणि साडेआठ लाखांवर आला. मात्र आता प्रत्यक्षात बँका आणि आयटीने घातलेल्या घोळामुळे आता प्रत्यक्षात साडेतीन लाख शेतकऱ्यांनाच याेजनेचा फायदा मिळणार आहे. आॅनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांचे बँक खाते अाधार कार्डशी लिंक करताना आयटी विभागाने बऱ्याच चुका केल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. तीन बँक खात्यासाठी एकाच शेतकऱ्याचे आधारकार्ड जोडले गेले. त्याचप्रमाणे एकाच शेतकऱ्याने जिल्हा बँक तसेच राष्ट्रीयकृत बँकेकडून दीड लाखांपर्यंतचे कर्ज घेतले असले तरी त्याचे एकाच बँकेतील कर्ज रेकाॅर्डवर आल्याने आॅनलाईन सिस्टिमचा काय फायदा झाला, असा सवाल एका मंत्र्याने केला.


कर्जमाफीची प्रमाणपत्रे दिली

मंगळवारी 18 आॅक्टोबरला मंत्रालयातील एका कार्यक्रमात तसेच पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्रे देण्यात आली होती. ही प्रमाणपत्रे म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, असे सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात अजूनही ९३७ शेतकऱ्यांना आपल्या नावावर कर्ज असल्याचे दिसून आले. काहींनी याविषयी तक्रार केल्यानंतर अजून ही योजना प्रत्यक्षात कागदावर यायला काही दिवस लागणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात आल्याचे मंत्र्यांनी बोलून दाखवले.विशेष म्हणजे अनेकांच्या प्रमाणपत्रावर कर्जाचा वेगळाच आकडा होता, अशा तक्रारीही आता समोर येत आहेत.


३० नोव्हेंबरपर्यंत वाट पाहा

बँका आणि आयटीतील घोळामुळे कर्जमाफी सुरळीत होण्यासाठी महिन्याभरापेक्षा अिधक वेळ लागणार आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहचेल, असे आश्वासन नव्याने देण्यात आले आहे. कर्जमाफीसाठी पहिल्या टप्प्यात ४००० कोटींची कर्जमाफी दिली जाणार असून, यासाठी शासकीय तिजोरीतून निधीही संबंधीत बँकांकडे वर्ग करण्यात आला आहे. या बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. यापैकी ३२ हजार कोटी शेतकरी कर्जमाफीसाठी, तर ८०० कोटी जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहे, त्यांना प्रत्येकी २५ हजार प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय झाला होता. पण, यापैकी बहुतांशी मदत जमा होताना दिसत नसल्याचे चित्र आहे.



हेही वाचा - 

शेतकरी कर्जमाफीवरुन राजकीय 'बडवा-बडवी'!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा