विविध मागण्यांसाठी राज्यातील दीड लाखांहून अधिक वीज कामगार, अभियंते आणि अधिकाऱ्यांनी रविवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. या कारणास्तव राज्यातील काही भागात बत्ती गुल होण्याची शक्यता आहे.
संपामुळे राज्यातील वीज वितरण व्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संपाला रोखण्यासाठी राज्य सरकारनं मेस्मा कायदा लागू केला आहे.
अत्यावश्यक सेवांसाठी हा कायदा लागू करून संपाला मनाई केली जाते. त्यानुसार आता वीज कर्मचाऱ्यांनाही संपास कायदेशीररीत्या मनाई करण्यास आली आहे. मात्र, तरीदेखील वीज कर्मचारी दोन दिवसीय संपावर ठाम आहेत.
वीज कर्मचाऱ्यांच्या काय आहेत मागण्या?
राज्यात सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. राज्यात उष्णतेची लाटही आल्यानं नागरिक हैराण झाले आहेत. तसंच, विविध पिकांनादेखील पाण्याची गरज असल्यानं वीज कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये, असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे.
याशिवाय केंद्राच्या खासगीकरणाच्या धोरणाला राज्य सरकारचाही विरोध असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे.
महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपनी प्रशासन व उर्जा सचिवांसोबत कामगार संघटनांनी चर्चा केली. मात्र, त्यात सामंजस्य करार झाला नाही. त्यामुळे आज सोमवारी व मंगळवारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.
मात्र, या तिन्ही कंपन्यातील वीज कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेत येत असून त्यांच्यासाठी मेस्मा लागू केल्याचे प्रसिद्ध पत्रक राज्य सरकारनं जारी केलं आहे. या माध्यमातून कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे राज्य सरकारनं म्हटलं आहे.
हेही वाचा