लोकल, मॉल सुरू; वाचा काय बंद? काय सुरू?

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यात अनेक जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा मिळाली आहे. तसंच, शॉपिंग मॉल्स, हॉटेल व्यावसायिकांनाही निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या घटल्यानं टप्प्याटप्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहे. १५ ऑगस्टपासून मुंबईकरांची लाइफलाइन असलेली लोकलही अटीशर्तीसह सर्वसामान्यांसाठी सुरू होत आहे.

शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट, जिम आणि स्पा ५० टक्क्यांच्या उपस्थितीत रात्री १० पर्यंत सुरू राहणार आहेत. मात्र, धार्मिक स्थळे, सिनेमा हॉल, थिएटर आणि मल्टिप्लेक्स बंदच राहणार आहे.

काय सुरू, काय बंद राहणार?

कोरोना लसीचे २ डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. हॉटेल व रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेनं सुरू रात्री १० पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करावे, अशी राज्य सरकारची सूचना आहे. तसंच, लसीकरणानंतर १४ दिवस उलटून गेले आहेत का?, याची खात्रीही करण्यात यावी, असं राज्य सरकारनं म्हटलं आहे.

दुकाने देखील रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्यात परवानगी देण्यात आली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात यावे, अशी अट कायम आहे. शॉपिंग मॉलसाठीही याच अटी कायम ठेवल्या आहेत. ग्राहकांनाही मॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे बंधनकारक असणार आहे.

५० टक्के क्षमतेनं सुरू

रविवारपासून जिम, योगा सेंटर, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा या सेवा ५० टक्के क्षमतेनं रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर इनडोअर स्पोर्ट्स बॅटमिंटन, टेबल टेनिस, स्व्कॉश, मल्लखांब या खेळांसाठी परवानगी देण्यात आली असून हॉलमध्ये एकावेळी २ खेळाडूंनाच परवानगी देण्यात येणार आहे.

खेळाडू, मॅनेजर, सदस्य आणि सफाई कर्मचाऱ्यांकडे लसीकरण प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. लग्न समारंभात सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून १०० लोकांना परवानगी देण्यात आली आहे.

धार्मिक स्थळांना बंदी

सिनेमा हॉल, थिएटर आणि मल्टिप्लेक्स अद्याप बंदच राहणार आहेत. त्याबरोबरच, मंदिर व अन्य धार्मिळ स्थळांवरही निर्बंध कायम आहेत. सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांवर बंदी कायम असून गर्दी वाढवणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या