वसई किल्ल्यातील 3 ऐतिहासिक चर्चचे संवर्धन होणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने  Archaeological Survey of India (ASI) वसईतील 3 चर्चचे कायापालट करण्याचे काम हाती घेतले आहे.

ऐतिहासिक वसई फोर्ट (Vasai Fort) परिसरातील सेंट बॅप्टिस्ट चर्च, सेंट डॉमिनिक चर्च आणि सेंट ऑगस्टीन चर्चच्या अवशेषांच्या संवर्धनासाठी विशेष कामे हाती घेण्याची घोषणा केली आहे. याशिवाय किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर माइल्ड स्टील स्लायडिंग गेट बसवणे आणि पर्यटकांसाठी सुविधा विकसित करण्याचाही आराखडा तयार करण्यात आला आहे.

पंतप्रधान तक्रार निवारण पोर्टलवर दाखल करण्यात आलेल्या सार्वजनिक तक्रारीला उत्तर देताना ASI च्या मुंबई सर्कलने ही माहिती दिली. मुंबईतील रहिवासी विनोद रोशन डी’सूझा यांनी वसई किल्ल्याच्या जतन आणि संरक्षणाबाबत चिंता व्यक्त केली होती.

ASI ने सांगितले की, वसई किल्ला हा केंद्र सरकारच्या संरक्षणाखालील ऐतिहासिक स्मारक असून त्याची देखभाल भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग  Ancient Monuments and Archaeological Sites and Remains (AMASR) Act 1958 आणि 1959 च्या नियमांनुसार केली जाते. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या वारसा स्थळांपैकी एक असलेल्या या किल्ल्याचे संवर्धन आणि पर्यटक व्यवस्थापन सुधारण्यासाठी ही कामे केली जात आहेत.

सुमारे 3,300 मीटर परिघ आणि 109 एकर परिसरात पसरलेल्या या किल्ला संकुलात सात चर्च, एक सिटाडेल आणि अनेक पुरातत्त्वीय रचना आहेत. त्यामुळे संवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणावर आणि सातत्याने करावे लागत असल्याचे ASI ने नमूद केले.

ASI नुसार, सेंट फ्रान्सिस्कन चर्च, सेंट गोंसालो गार्सिया चर्च आणि ऐतिहासिक बाले किल्ला परिसरात महत्त्वाची पुनर्बांधणी कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

या कामांमध्ये भिंतींवरील झाडाझुडपे आणि वेलीं काढणे, दगडी फरशी दुरुस्ती, स्टोन अॅप्रन बांधकाम, वॉटरप्रूफिंग, भेगा भरणे आणि ढिगारा हटवणे यांचा समावेश आहे. अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी रस्त्यालगत ग्रिल फेन्सिंगही बसवण्यात आले आहे.

तसेच Misericordia संरचनेतही झाडाझुडपे हटवणे, भिंतींची दुरुस्ती आणि ढिगारा साफ करण्याची कामे सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

किल्ल्याच्या समुद्र आणि भू-प्रवेशद्वारांवर लाकडी गेट बसवण्याचे काम सुरू असून उर्वरित भागात ग्रिल फेन्सिंग उभारले जात आहे.

मुंबईपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेला वसई किल्ला महाराष्ट्र किनारपट्टीवरील महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा मानला जातो. 15 व्या शतकात गुजरात सल्तनतच्या काळात हा भाग सागरी व्यापार आणि जहाजबांधणी केंद्र होता. 1530 च्या दशकात पोर्तुगीजांनी किल्ला ताब्यात घेतल्यानंतर येथे चर्च, कॉन्व्हेंट आणि बाजारपेठांनी समृद्ध अशी वसाहत विकसित केली.

दोन शतकांहून अधिक काळ हा किल्ला पश्चिम भारतातील पोर्तुगीज सत्तेचे केंद्र राहिला. 1739 मध्ये चिमाजी अप्पा (Chimaji Appa) यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ला जिंकला आणि पुढे 19व्या शतकात ब्रिटिशांनी त्यावर ताबा मिळवला.


हेही वाचा

पावसानंतर BMC चा 104% गाळ काढल्याचा दावा वादात

पुढील बातमी
इतर बातम्या