राज्यभरात (State) तब्बल 60 ट्रॅफिक गार्डन्स (Traffic gardens) उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला आहे. प्रत्येक उद्यानासाठी सुमारे 1 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (pratap sarnaik) यांनी ही माहिती दिली.
राज्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांविषयी लहान वयातच जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वाहतूक उद्यान उभारण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून वाहतूक नियमांचे शिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे. या उद्यानांमध्ये लहान रस्ते, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक सिग्नल, दिशादर्शक फलक आणि छोट्या वाहनांच्या प्रतिकृती उभारण्यात येणार आहेत. यामुळे मुलांना खेळत-खेळत वाहतूक नियम समजावून सांगितले जाणार आहेत.
उद्याने केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुली असतील. त्यामुळे वाहतूक शिस्त आणि सुरक्षिततेबाबत व्यापक जनजागृती होण्यास मदत होईल. भविष्यात जबाबदार वाहनचालक घडवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास परिवहन विभागाने व्यक्त केला आहे.
उद्यानांमध्ये वाहन परवाना प्रशिक्षणासाठी ‘ट्रायल ट्रॅक’ची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी शाळांना वेळेनुसार प्रवेश दिला जाईल आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नाममात्र शुल्क आकारले जाईल.
पर्यावरण संवर्धनाचाही संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे. उद्यानांमध्ये देशभरातील दुर्मिळ वृक्षांच्या जाती लावण्यात येणार आहेत. त्या वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व दर्शवणारी माहितीही उपलब्ध असेल. वाहतुकीच्या नियमांसोबतच पर्यावरण संवर्धनाचे धडेही नागरिकांना दिले जाणार आहेत.
याशिवाय भविष्यातील ई-वाहनांच्या प्रतिकृती आणि त्यासंबंधी माहितीही उद्यानांमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे. त्यामुळे ही उद्याने अबालवृद्धांसाठी ज्ञान, प्रशिक्षण आणि विरंगुळ्याचे केंद्र म्हणून विकसित करण्याचा सरकारचा मानस आहे.
हेही वाचा