माहुल हा नरकच! इथे माणसेही चोरीला जातील...

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येणाऱ्या प्रकल्पांमधील बाधितांचे पुनर्वसन सरसकटपणे माहुलमधील वसाहतींमध्ये केले जात आहे. परंतु माहुलमधील महापालिकेच्या वतीने प्रकल्पबाधितांना जाणाऱ्या या घरांची नगरी ही स्वर्ग नसून नरक आहे. याठिकाणच्या घरांचे दरवाजे, खिडक्या, नळ, एवढेच काय तर लिफ्टही चोरीला गेल्याचा गौप्यस्फोट करत नगरसेवकांनी आता इथे राहायला येणारी माणसे तेवढीच चोरीला जाण्याची भिती नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या घरांच्या वाटपाला महापौरांनी स्थगिती दिली असून, पुढील 10 दिवसांमध्ये येथील घरांचे वितरण कुणालाही करण्यात येवू नये, असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.


हेही वाचा

आमची घरं इथे..आणि पुनर्वसन इतक्या लांब का?


नाल्यांच्या रुंदीकरणात बाधित होणाऱ्या कुटुंबांना हटविण्यासाठी महापालिकेच्यावतीने 314 ची नोटिस जारी करुन त्यांना सात दिवसांमध्ये कागदपत्रे सादर करण्यास सांगितले जाते. जर ही कागदपत्रे न दिल्यास त्यांना अपात्र ठरवले जात आहे. तसेच जी कुटुंबे यामुळे बाधित होणार आहेत, त्यांना माहुल येथे घरे दिली जाणार आहेत. त्यामुळे नाले रुंदीकरणात बाधित होणाऱ्या सर्व कुटुंबांचे 3 कि.मी परिसरातच पुनर्वसन केले जावे, अशी मागणी करत भाजपाचे नगरसेवक संदीप पटेल यांनी 66 ब अन्वये महापालिका सभागृहात चर्चा उपस्थित केली. यावर शिवसेनेच्यावतीने किशोरी पेडणेकर वगळता सर्वांनी या चर्चेला पाठिंबा दिला. शितल म्हात्रे यांनी मत व्यक्त करत प्रशासन पात्रता सिद्ध करण्यासाठी एवढा कमी वेळ देत नसल्याचे सांगितले. माजी महापौर विशाखा राऊत यांनी प्रत्येक विभागांमध्ये खासगी विकासकांकडून प्रकल्पबाधितांसाठी असलेल्या सदनिका किती ताब्यात घेण्यात आल्या आहेत आणि मिळणार आहे, याची माहितीच सर्व नगरसेवकांना सादर केली जावी, असे सांगितले.

घरांऐवजी रेडीरेकनरप्रमाणे पैसे द्या -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी घाटकोपरमध्ये तानसा पाईपलाईनवरील 1600 कुटुंबांना स्थलांतरीत केले जाणार असल्याचे सांगत पहिल्या टप्प्यात 400 कुटुंबांवर कारवाई केली जात आहे. यासर्वांना माहुलमध्ये घरे दिली होती. परंतु गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी त्यांना तिथे जावू दिले नाही. त्यामुळे 400 प्रमाणे उर्वरीत कुटुंबांचेही पुनर्वसन माहुलमध्ये न करता कुर्ला किंवा आसपासच्या परिसरात करावे, अशी सूचना केली. विरोधी पक्षनेते रवीराजा यांनी सत्ताधारी शिवसेनेचा आणि पहारेकरी असलेल्या भाजपाचा समाचार घेत आपल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली असल्याचे सांगितले. जर प्रकल्प हाती घेता तर बाधितांना घरे द्यावी. जर घरे उपलब्ध नसतील तर कमर्शियलप्रमाणे निवासी घरांनाही रेडीरेकनरप्रमाणे पैसे द्यावेत, म्हणजे त्यांना स्वत:चे घर घेता येवू शकेल, असे त्यांनी सांगितले. तसेच प्रकल्पबाधितांच्या घरांसाठी मिठागराच्या जागेचा पर्याय शोधून तिथे बांधकाम केले जावे,असेही रवी राजा यांनी सांगितले.

पुनर्वसनाचा निर्णय महापौरांनी घ्यावा -

भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी माहुलमधील प्रकल्पबाधितांच्या घरांमध्ये घुसखोर घुसले असून, तेथील घरांचे दरवाजे, खिडक्या, नळ, शौचालयाची भांडी सर्वच चोरीला गेले आहेत. एवढेच काय लिफ्टही चोरीला गेल्याचा गौप्यस्फोट केला. मेट्रोमधील बाधितांचे पुनर्वसन त्याच भागात करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या बाधितांचे पुनर्वसनही त्याच भागात होईल हे महापौरांनी याच सभागृहात सांगावे, असे आव्हान कोटक यांनी केले. माहुल हा नरकच असल्याचे सभागृहनेते यशवंत जाधव यांनी येथील घरांचे सर्व साहित्य चोरीला जात आहे. नशिब येथील माणसे चोरीला गेली नाही, अशी भीती व्यक्त करत या वसाहतीत संक्रमण शिबिरासाठी आणि कायमस्वरुपी म्हणून किती सदनिकांचे वाटप झाले याची माहिती या सभागृहापुढे आणली जावी, अशी मागणी जाधव यांनी केली. 


हेही वाचा

घाटकोपरमधल्या झोपड्यांचे पुनर्वसन कुर्ल्यात कधी होणार?


आपल्या विभागातील 220 कुटुंबे एक वर्षांपूर्वी या माहुलमध्ये राहायला गेली होती. त्यातील 21 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहितीही जाधव यांनी दिली. यावेळी प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त आय.ए.कुंदन यांनी बोरीवलीमध्ये प्रकल्पबाधितांसाठी घरे बांधण्याचा विचार केला असून, सध्या माहुलमध्येच घरे असल्यामुळे त्या घरांचे वाटप केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पुढील दहा दिवसांमध्ये या प्रकल्पबाधितांसाठीच्या वसाहतीची पाहणी आपण गटनेत्यांसह करणार आहोत. परंतु तोपर्यंत कुणालाही या घरांचे वाटप केले जावू, नये असे सांगत या घरांच्या वाटपाला स्थगिती दिली. यावेळी झालेल्या चर्चेत मंगेश सातमकर, शितल म्हात्रे, उमेश माने, अभिजित सामंत, ज्योती अळवणी,जगदीश अमिन कुट्टी,सुनिता मेहता, मनिषा, मकरंद नार्वेकर, हरिष छेडा, कप्तान मलिक, राजेश फलवारिया, प्रकाश गंगाधरे,सुनिता यादव, राजूल पटेल आदींनी चर्चेत भाग घेत आपल्या विभागातील समस्या मांडल्या.

पुढील बातमी
इतर बातम्या