घाटकोपरमधल्या झोपड्यांचे पुनर्वसन कुर्ल्यात कधी होणार?

 Mumbai
घाटकोपरमधल्या झोपड्यांचे पुनर्वसन कुर्ल्यात कधी होणार?

मुंबई - महापालिकेच्या तानसालगतच्या झोपड्या तोडून तेथील झोपड्यांमधील पात्र कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परंतु या आदेशाचे उल्लंघन होत असून घाटकोपरमधील तानसा जलवाहिनीलगतच्या झोपड्यांचे पुनर्वसन आधी माहुलमध्ये करण्यात आले. परंतु त्यानंतरही कारवाई थांबवून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कुटुंबांना कुर्ला कोहीनूर कंपाऊंडमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या झोपडीधारकांचे पुनर्वसन कुर्ला येथे होणार कधी असा सवाल विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केला आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे महापालिका प्रशासन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचा आरोप केला. न्यायालयाच्या आदेशानुसार धारावी, मुलुंड आणि भांडुप येथील तानसालगतच्या झोपड्या हटवण्यात आल्या. घाटकोपरमधील पात्र आणि अपात्र झोपड्यांची यादी तयार करून स्थलांतरीत कुटुंबांना नोटीस बजावल्या. त्याप्रमाणे 400 झोपड्यांना माहुल येथे स्थलांतरीत करण्याचे आदेश दिले. सदनिकांच्या चाव्या दिल्या. परंतु प्रत्यक्षात या लोकांनी घराचा ताबा घेतल्यानंतरही घरे भाड्याने देवून झोपडयांमध्ये राहायला आली. त्यामुळे कुणाच्या आदेशामुळे झोपड्यांवरील ही कारवाई थांबवण्यात आली आहे, असा आरोप प्रवीण छेडा यांनी केला आहे. मात्र, आता येथीलच 400 कुटुंबांना कुर्ला कोहीनूर कंपाऊंडमध्ये सदनिका देण्याचा निर्णय घेतला आहे. झोपड्यांचे पुनर्वसन केल्यानंतर त्या त्वरीत तोडून टाकणे बंधनकारक आहे. मात्र, एकीकडे झोपड्यांवरील कारवाई थांबवण्याची सूचना नगरसेवकाने केली तर त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि मंत्र्यांच्या आदेशानुसार ही कारवाई थांबवली जाते. त्यामुळे महापालिका आयुक्तांसह सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त यांची भूमिका संदिग्ध असून याप्रकरणी सर्वांची चौकशी करून आपला अहवाल पुढील बैठकीत सादर करावा, अशी मागणी छेडा यांनी केला.

Loading Comments