राज्यात मलेरिया आणि डेंग्यूचे थैमान

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

ऐन उन्हाळ्यातच मलेरिया, डेंग्यू व चिकुनगुनिया या किटकजन्य आजारांचा फैलाव झाला आहे.

जानेवारी ते 7 मार्च 2026 पर्यंत तब्बल 2,392 रुग्णांची नोंद झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यात एकट्या मुंबईत मलेरियाचे 918 तर डेंग्यूचे 182 रुग्ण आढळले आहेत.

मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, लेप्टो या किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर होतो.

मात्र, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या किटकजन्य आजारांचा फैलाव हा हिवाळ्यात व उन्हाळ्यातही होत असल्याचे राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

जानेवारी ते 7 मार्च 2026 या कालावधीत मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनिया (chikun guniya)या आजारांचे हजारो रुग्ण नोंदवले गेले आहेत.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार या कालावधीत राज्यात मलेरियाचे 1335 , डेंग्यूचे 823 आणि 234 चिकुनगुनियाच्या रुग्णांची नोंद झाली आहे.

मात्र दिलासादायक बाब म्हणजे या तिन्ही आजारांमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची एकही नोंद नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

2025 वर्षात मलेरियाचे (malaria) एकूण 32,686 रुग्ण नोंदले गेले असून 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 मार्च 2026 पर्यंत मलेरियाचे 2,336 रुग्ण नोंदवले गेले आहेत.

डेंग्यूच्या (dengue) बाबतीत 2025 मध्ये 14965 रुग्ण आढळले आहेत. तसेच 34 जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. 7 मार्च 2026 पर्यंत 253 रुग्ण नोंदले गेले असून मृत्यूची नोंद नाही.

चिकनगुनियाचे 2025 मध्ये 1,184 रुग्ण नोंदले गेले असून मृत्यूची नोंद नाही. तसेच 7 मार्च 2026 पर्यंत 236 रुग्ण आढळले असून मृत्यूची नोंद झालेली नाही.

मुंबईत (mumbai) किटकजन्य आजारांचा सर्वाधिक प्रभाव दिसून येत आहे. मुंबई महापालिका (brihanmumbai municipal corporation) क्षेत्रात मलेरियाच्या 918 रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 222 रुग्ण पी.एफ. (प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम) प्रकारातील आहेत.

तसेच 104 रुग्ण बाहेरून आलेले (इम्पोर्टेड) असल्याची नोंद आहे. डेंग्यूच्या बाबतीतही मुंबई आघाडीवर आहे. मुंबईत जवळपास डेंग्यूचे 182 रुग्ण नोंदवले गेले आहेत. चिकुनगुनियाचेही 9 रुग्ण मुंबईत आढळले आहेत.


हेही वाचा

ठाणे मेट्रोसाठी 3,000 हून अधिक झाडे धोक्यात

गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

पुढील बातमी
इतर बातम्या