'मरिन ड्राइव्ह'च्या जागतिक वारशाला रहिवाशांचा विरोध

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

'क्वीन्स नेकलेस' अशी ओळख असलेल्या 'मरिन ड्राइव्ह' परिसराला यापूर्वीच 'हेरिटेज साईट' (पुरातन वारसा)चा दर्जा मिळालेला आहे. त्यातच आता 'मरिन ड्राइव्ह'चा 'युनेस्को'च्या 'वर्ल्ड हेरिटेज साईट' (जागतिक वारसा)च्या यादीत सामावेश करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या परिसराचा 'वर्ल्ड हेरिटेज साईट'मध्ये समावेश झाल्यास येथील ३७ इमारतींच्या पुनर्विकासाला खिळ बसणार आहे. त्यामुळं या इमारतीतील रहिवाशांनी या प्रक्रियेला विरोध सुरू केला आहे.

'मरिन ड्राइव्ह' परिसरातील या ३७ इमारतींमध्ये एकूण १०४० फ्लॅटधारक राहतात. या फ्लॅटधारकांशी कुठलीही चर्चा न करता, महापालिका आणि नगरविकास खाते ही प्रक्रिया परस्पर राबवत असल्याचा फ्लॅटधारकांचा आरोप आहे.

पुनर्विकासाला अडथळा?

या भागातील बहुतांश इमारती १९४० ते १९५० मध्ये बांधलेल्या आहेत. ५० ते ६० वर्षे जुन्या इमारतींचा पुर्नविकास करणे गरजेचं आहे. पण या परिसराचा 'वर्ल्ड हेरिटेज साईट'मध्ये समावेश झाल्यास इमारतींचा पुनर्विकास करणं कठीण होईल. त्यामुळं हेरिटेज नको, पुनर्विकास हवा, अशी मागणी फ्लॅटधारकांनी केली आहे.

नवी नियमावली काय म्हणते?

नव्या नियमावलीनुसार, 'मरिन ड्राइव्ह' रस्त्यालगतच्या पहिल्या रांगेतील इमारतींची उंची सध्याच्या २४ मीटरवरून आता ३२ मीटरपर्यंत वाढवता येऊ शकते. तर मागच्या रांगेतील इमारतींची उंची २४ मीटरवरून ५८ मीटरपर्यंत वाढवता येऊ शकते. 'मरिन ड्राइव्ह'च्या उर्वरीत २ झोनसाठी नियमावली प्रस्तावित असून नव्या प्रस्तावानुसार जिमखाना झोनमधील इमारतींची उंची ११ मीटरपासून १४ मीटर, तर चौपाटी झोन मधील इमारतींची उंची २१ मीटरपासून ३२ मीटरपर्यंत वाढवता येऊ शकते.

नगरविकास खात्याचा प्रस्ताव आमच्यासाठी मोठा अडथळा असून पुनर्विकासाला बाधा निर्माण करणारा आहे. 'मरिन ड्राइव्ह'ला युनेस्कोच्या 'वर्ल्ड हेरिटेज साईट'मध्ये टाकण्याचा घाट घातला जात आहे, हे ऐकल्यानंतर आम्हाला मोठा धक्का बसल्याचे हरी निवास येथील रहिवासी कनवल शहापुरी म्हणाले.

हेरिटेजबाबत रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 'मरिन ड्राइव्ह' परिसर 'वर्ल्ड हेरिटेज साइट' झाल्यास विकासाला खीळ बसेल, अशी भीती रहिवाशांमध्ये आहे. जागतिक दर्जा देण्याबाबत रहिवाशांचे मत लक्षात घेणे गरजेचे आहे. महापालिका व नगरविकास खाते सर्व लोकप्रतिनिधी व स्थानिकांना अंधारात ठेवून हा निर्णय घेत असून आम्ही याविरोधात रस्त्यावर उतरणार आहोत.

- राज पुरोहित, स्थानिक आमदार

'मरिन ड्राइव्ह'ला अगोदरच 'हेरिटेज साईट'चा दर्जा मिळालेला आहे. परिसराला जागतिक दर्जा लागू झाल्यास नियमात काहीच बदल होणार नाही. शुक्रवारी 'युनेस्को वर्ल्ड हेरिटेज' समितीचे प्रतिनिधी मुंबईच्या भेटीवर आले होते. त्यांच्यासोबतच्या बैठकीत 'मरिन ड्राइव्ह रेसिडेंट असोसिएशन'चे काही सदस्यही उपस्थित होते. या प्रक्रियेला केवळ काही जणांचा विरोध आहे. येत्या ८ दिवसांत स्थानिकांशी बोलून 'युनेस्को वर्ल्ड हेरिटेज' समितीचे प्रतिनिधी आपला अहवाल सादर करतील.

- नितीन करीर, प्रधान सचिव, नगरविकास खाते

तर, रस्त्यावर उतरू

एकीकडे मुंबईला शांघाय बनवण्याची स्वप्ने दाखवली जातात, तर दुसरीकडे जागतिक दर्जा देऊन विकासच रोखून धरण्याचे प्रयत्न होत आहेत. ५० ते ६० वर्षे जुन्या इमारतींचा पुनर्विकास न झाल्याने त्या कोसळल्यास जबाबदार कोण? असा सवाल स्थानिकांनी केला आहे. इमारत कोसळून मरण्यापेक्षा 'मरिन ड्राइव्ह'ला जागतिक दर्जा मिळाल्यास संपूर्ण कुटुंबासहित रस्त्यावर उतरून 'मरिन ड्राइव्ह' अडवू धरू, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.


हे देखील वाचा -

'क्वीन्स नेकलेस'चा 'हा' इतिहास तुम्हाला माहित आहे का?


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या