शिवाजी पार्ककरांनो, महापौर निवासस्थानात डोकवायचे नाही हा!

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

महापौरांच्या निवासस्थानाची जागा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी आजही या ठिकाणी महापौरांचे वास्तव्य आहे. परंतु मुंबईच्या प्रथम नागरिकांचे निवासस्थान असलेल्या या महापौर निवासस्थानाचे बाहेरुन होणारे दर्शनच बंद करण्यात आले आहे. निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर अपारदर्शक शीट लावून हे प्रवेशद्वार झाकून टाकण्यात आले आहे. त्यामुळे नक्की प्रायव्हसी कुणाला हवी आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्मारकाआधीच जागा बंद!

निवासस्थान स्मारकासाठी देण्याची कागदोपत्री सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी अद्यापही महापौरांच्या पर्यायी निवासस्थानाची व्यवस्था झालेली नाही. भविष्यात हे निवासस्थान महापौरांचे राहणार नसून ते बाळासाहेब ठाकरे ट्रस्टच्या नावे होऊन त्या ठिकाणी स्मारक उभारले जाणार आहे. पण स्मारक उभारण्यापूर्वीच या निवासस्थानाच्या जागेचं बाहेरच्यांना दर्शन होऊ नये, याची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यासाठी उंच अॅक्रेलिक शीट लावण्यात आले आहे.

का लावले अपारदर्शक शीट?

या शीटमुळे महापौर निवासस्थानाचे मुखदर्शन बंद झाले आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सुरक्षेच्या मुद्दयावरून या शीटचा वापर प्रवेशद्वारावर करण्यात आल्याचे म्हटले आहे. मागील काही दिवसांपूर्वीच हे शीट बसवून प्रवेशद्वार बंदीस्त करण्यात आले आहे. त्यामुळे महापौरांच्या प्रायव्हसीचा मुद्दा उपस्थित झाला असून असा कोणता प्रकार घडला ज्यामुळे महापौरांना हा निर्णय घेऊन प्रवेशद्वारावर अपारदर्शक शीट लावून ते बंदिस्त करावे लागले? असा प्रश्न सर्वांना पडू लागला आहे.

ठाकरे कुटुंबासाठी गेट झाकले?

महापौर निवासाचा वापर हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून प्रत्येक संध्याकाळी केला जातो. बऱ्याचदा पक्षप्रमुख आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे निवासस्थानाच्या लॉनसह मोकळ्या जागांवर फेरफटका मारत असतात. त्यामुळे ठाकरे कुटुंबाची प्रायव्हसी राखण्यासाठी प्रवेशद्वारावर हे अॅक्रेलिक शीट बसवण्यात आल्याचेही समजते.


हेही वाचा

भाजपा म्हणतंय महापौरांच्या निवासस्थानासाठी 'हीच' जागा योग्य

पुढील बातमी
इतर बातम्या