Advertisement

भाजपा म्हणतंय महापौरांच्या निवासस्थानासाठी 'हीच' जागा योग्य


भाजपा म्हणतंय महापौरांच्या निवासस्थानासाठी 'हीच' जागा योग्य
SHARES

मुंबईच्या महापौरांचा सेवानिवासस्थानाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपाने महापौरांचं निवासस्थान राणीबाग किंवा मलबारहिलऐवजी महालक्ष्मी येथे महापालिका अधिकाऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या जिमखान्याच्या जागेवर बांधलं जावं, अशी मागणी केली आहे. महापौरांच्या निवासस्थानासाठी हीच जागा योग्य असल्याचं भाजपानं म्हटलं आहे. 


'ही' तर दिशाभूल'

दरम्यान दराडे कुटुंबाला दिलेला बंगला त्यांच्याकडे कायम ठेवण्यासाठी भाजपाकडून अशाप्रकारे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे.


राणीबाग नाही महालक्ष्मी

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत महालक्ष्मी येथे महापालिका अधिकाऱ्यांसाठी जिमखाना बांधण्याचा प्रस्ताव मंजुरीला आला असता भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी याठिकाणी महापौरांचं निवासस्थान बांधलं जावं, अशी मागणी केली आहे. 

महापौरांच्या निवासस्थानासाठी राणीबाग आणि मलबारहिलच्या बंगल्याच्या जागा योग्य नसून रेसकोर्स आणि लाला कॉलेजवळील जागाच महापौरांच्या निवासस्थानासाठी योग्य असल्याचं सांगितलं. यामुळे उपनगरातून थेट राजीव गांधी सागरी सेतूवरून थेट महालक्ष्मीला आणि वांद्रे येथून थेट महापौरांचं निवासस्थान गाठता येईल. त्यामुळे ही जागा मध्यवर्ती ठिकाणी असल्याचं सांगत याठिकाणी महापौरांचं निवासस्थान बांधण्याची मागणी कोटक यांनी केली.


याला शिवसेनेचा विरोध

महापौरांच्या निवासस्थानाच्या जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक उभारलं जाणार आहे. त्यामुळे महापौरांच्या निवासस्थानाची पर्यायी जागा शोधली जात आहे. राणीबागेतील बंगला यासाठी निवड केला असला तरी याला शिवसेनेनं विरोध करत मलबालहिलमधील बंगल्यातच महापौरांचं निवासस्थान व्हावं, अशी मागणी केली आहे. 

पण मलबारहिलमधील बंगला सनदी अधिकारी प्रविण दराडे आणि त्यांची पत्नी पल्लवी दराडे यांनी अडवला आहे. त्यातच आता भाजपाने अशाप्रकारे मागणी करत महापौर निवासस्थान मुद्द्याला वेगळंच वळण दिलं आहे.


यांनी घेतला भाजपाचा समाचार

भाजपाच्या या मागणीचा सभागृहनेते यशवंत जाधव यांनी समाचार घेत, भाजपाला महापौरांची चिंता आहे की दराडे कुटुंबांची? असा सवाल केला आहे. महापौरांसाठी नवीन जागेचा पर्याय त्यांनी सूचवला असला तरी मलबारहिलमधील दराडे कुटुंबांनी अडवलेला बंगला प्रथम खाली व्हायला हवा. पण दराडे कुटुंबांना मुख्यमंत्र्यांनी दिलेला बंगला त्यांच्याकडे कायम राहावा यासाठीच भाजपा, महापौरांचं निवासस्थान महालक्ष्मीला बांधण्याची मागणी करत असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा