31 जुलैपर्यंत भरता येणार गिरणी कामगारांना अर्ज

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गेल्या महिन्याभरापासून जे गिरणी कामगार हक्काच्या घरासाठी याआधी अर्ज भरू शकले नाहीत, त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्याचे काम सध्या म्हाडाकडून सुरू आहे. आता अर्ज भरण्यासाठी केवळ चार दिवस उरल्याने गिरणी कामगारांची चांगलीच धावपळ सुरू असेल. पण गिरणी कामगारांनो...आता धावपळ करण्याची गरज नाही. कारण अर्ज भरण्यासाठी म्हाडाने महिन्याभराहून अधिक मुदतवाढ दिली आहे. 27 जूनपर्यंत जिथे अर्ज भरता येणार होते, तिथे आता 31 जुलैपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकणार आहात. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून शुक्रवारी यासंबंधी घोषणा करण्यात आली आहे.


आणखी एक संधी!

26 मे पासून याआधी अर्ज भरू न शकलेल्या गिरणी कामगारांना एक शेवटची संधी देत अर्ज भरून घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार 27 जूनपर्यंत कामगारांना अर्ज भरण्यास मुदत दिली होती. मात्र कामगार मोठ्या संख्येने खेड्यापाड्यात विखुरल्याने,तसेच संगणकीय ज्ञान कामगारांना नसल्याने अर्ज भरणे अनेक कामगारांना शक्य होताना दिसत नाही. अर्ज भरण्यास विलंब होतोय, वेळ लागतोय. त्यामुळे कामगार आणि कामगार संघटनांकडून मुदतवाढीची मागणी होत होती. गिरणी कामगार कल्याणकारी संघाने तर मुदतवाढ देण्यासंबंधीचे पत्रही गुरुवारी म्हाडाला दिले होते. त्यानुसार ही मागणी मान्य करत अखेर शुक्रवारी म्हाडाने 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता अधिकाधिक कामगार अर्ज भरू शकतील असे म्हणत संघटनांनी म्हाडाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.



हे देखील वाचा -  

अर्ज भरण्यासाठी गिरणी कामगारांना हवीय मुदतवाढ

गिरणी कामगारांना फॉर्म भरण्याची पुन्हा संधी


पुढील बातमी
इतर बातम्या