Advertisement

26 मेपासून गिरणी कामगारांना म्हाडाचे अर्ज भरता येणार


26 मेपासून गिरणी कामगारांना म्हाडाचे अर्ज भरता येणार
SHARES

गिरणी कामगारांसाठी म्हाडाने आनंदाची बातमी दिली आहे. गिरणी कामगारांसाठी गिरण्यांच्या जमिनीवरील हक्काच्या घर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया केव्हा होणार, या प्रश्नाचं उत्तर अखेर म्हाडाने दिलेलं आहे. शुक्रवार 26 मे पासून अर्ज न भरलेल्या गिरणी कामगारांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. यासंबंधीची जाहिरात अखेर म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून म्हाडाच्या संकेतस्थळावर मंगळवारी संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार अद्याप अर्ज न भरलेल्या गिरणी कामगारांना 26 मे पासून 27 जूनला रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

याआधी ज्या कामगारांनी म्हाडाच्या माध्यमातून अर्ज भरले आहेत, त्या कामगारांनाच गिरणी कामगारांच्या घराच्या सोडतीत सहभागी करून घेण्यात येत आहे. असे अंदाजे 1 लाख 48 हजार कामगार आहे. मात्र त्याचवेळी जे कामगार अर्ज भरू शकले नाहीत, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी पुन्हा एक संधी देत अर्ज भरून घ्यावेत, असे आदेश काही महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशांनुसार म्हाडाने एप्रिलमध्ये अर्ज भरून घेण्याचे जाहीर केले होते. मात्र तांत्रिक अडचणींमुळे त्यास विलंब झाला. पण अखेर मंगळवारी 23 मे रोजी म्हाडाने आपल्या संकेतस्थळावर यासंबंधीची जाहिरात प्रसिद्ध करत अर्ज न भरलेल्या कामगारांना खूशखबर दिली आहे.


हेही वाचा

गोरेगावातल्या 'त्या' जमिनीवर म्हाडा बांधणार ३००० घरं


ऑनलाईन पद्धतीने यावेळेस कामगारांना अर्ज भरण्याची संधी देण्यात आल्याने घरबसल्या अर्ज भरता येणार असून बँकेत खेटे मारावे लागणार नाहीत. तर गिरणी कामगारांना अर्ज भरणे सोपे व्हावे यासाठी आवश्यक ती मदतही म्हाडाकडून केली जाणार आहे. त्यामुळे आता कामगारांनी शक्य तितक्या लवकर अर्ज भरावेत असे आवाहन गिरणी कामगार कल्याणकारी संघाने केले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा