Advertisement

गुढी पाडवा: मराठी अस्मिता की ‘हिंदू’ ओळखीचं राजकारण?

धार्मिक ओळख ही या सणाचा भाग असली तरी, तिचं वाढतं राजकीय आणि सार्वजनिक प्रोजेक्शन अनेक प्रश्न निर्माण करतं.

गुढी पाडवा: मराठी अस्मिता की ‘हिंदू’ ओळखीचं राजकारण?
SHARES

गुढी पाडवा हा हिंदू सण म्हटलं की एक वेगळेच विसंगतीचे भाव निर्माण होतात. कारण तो केवळ धार्मिक नाही, तर मराठी ओळखीचा उत्सव आहे. पण त्याला हिंदू सण म्हणून ही ओळख हळू-हळू पुसली जात आहे का? असा प्रश्न देखील कोणाला पडू नये याची खरंच खंत आहे.

गुढी पाडवा हा सण महाराष्ट्रात केवळ नववर्षाची सुरुवात नसून, तो मराठी संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा जिवंत भाग आहे. मात्र, अलीकडच्या काळात या सणाला 'हिंदू नववर्ष' म्हणून अधिक ठळकपणे मांडण्याची प्रवृत्ती वाढताना दिसते. प्रश्न असा नाही की ही ओळख चुकीची आहे. प्रश्न असा आहे की, या प्रक्रियेत सणाची मूळ मराठी ओळख मागे पडतेय का?

धार्मिक ओळख ही या सणाचा भाग असली तरी, तिचं वाढतं राजकीय आणि सार्वजनिक प्रोजेक्शन अनेक प्रश्न निर्माण करतं. स्थानिक, भाषिक आणि सांस्कृतिक सणाला व्यापक आणि एकाच धार्मिक चौकटीत बसवण्याचा प्रयत्न का होत आहे?

घराबाहेर उभारली जाणारी गुढी, कडुलिंब-गूळ खाण्याची परंपरा आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्याची पद्धत या सगळ्यांमुळे गुढी पाडवा हा ठळकपणे ‘मराठी’ सण म्हणून ओळखला जातो.

पण पारंपरिक गुढी उभारणं, कडुलिंब-गूळ खाणं, घरगुती पूजा या गोष्टी हळूहळू बाजूला पडून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर 'हिंदू नववर्ष' म्हणून सार्वजनिक कार्यक्रम, रॅलीज यावर अधिक भर दिला जातो. यात सणाचं रूप बदलतं तो घरगुती आणि स्थानिक न राहता, अधिक व्यापक आणि एक साची ओळख घेतो.

जेव्हा एखाद्या सणाला एकाच धार्मिक ओळखीत घट्ट बांधण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा त्याची खरी ओळख कमी होण्याचा धोका निर्माण होतो. ‘मराठी सण’ म्हणून असलेली त्याची वैशिष्ट्यपूर्ण ओळख हळूहळू बाजूला पडते आणि एक व्यापक, पण तुलनेने एक साची ओळख पुढे येते.

गुढी पाडव्याचे मूळ हिंदू पंचांगात आहेत हे नाकारता येत नाही. पण त्याचं सांस्कृतिक रूप महाराष्ट्रात वेगळं विकसित झालं आहे. त्यामुळे त्याला 'हिंदू सण' म्हणणं म्हणजे त्याची मराठी ओळख दुर्लक्षित करणं आहे. इथे प्रश्न असा आहे की, तीच ओळख का ठळकपणे पुढे आणली जाते आणि इतर पैलू का दुर्लक्षित होत आहेत? याच्या मागे कुठला राजकीय अजंडा आहे? हा अजंडा का राबवला जात आहे?

सोशल मीडियावरही हा बदल स्पष्ट दिसतो. “Hindu New Year” हा शब्दप्रयोग वाढताना दिसतो, तर “गुढी पाडवा” हा शब्द तुलनेने कमी वापरला जातो. भाषा बदलली की, सणाची ओळखही बदलते ही एक सूक्ष्म पण महत्त्वाची प्रक्रिया आहे.

खरं तर आज गरज आहे ती सणांच्या मूळ स्वरूपाला समजून घेण्याची आणि त्याच्या सर्व पैलूंना मान्यता देण्याची. पण त्याला एका चौकटीत मर्यादित करण्याऐवजी, त्याची विविधता जपणं हीच खरी संस्कृतीची जपणूक ठरेल.

गुढी पाडवा हा दिवस हिंदू पंचांगानुसार नववर्षाची सुरुवात दर्शवतो, हे निर्विवाद आहे. पण तरीही एक महत्त्वाचा प्रश्न कायम राहतो जर हा 'हिंदू नववर्ष' असेल, तर तो देशभर 'गुढी पाडवा' या नावानेच का साजरा होत नाही?  

वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी आणि परंपरांनी साजरा होतो. महाराष्ट्रात तो “गुढी पाडवा” म्हणून ओळखला जातो, जिथे घराबाहेर गुढी उभारण्याची परंपरा आहे. पण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात हा दिवस उगादी म्हणून साजरा होतो, जिथे “उगादी पचडी” सारख्या स्थानिक परंपरा महत्त्वाच्या असतात. उत्तर भारतातही याच दिवशी नव समवतसर म्हणून नववर्ष साजरा केला जातो, मात्र तिथे गुढी उभारण्याची परंपरा आढळत नाही.

वेगवेगळ्या नावांनी तर ओळखला जातोच. शिवाय तो साजराही वेगवेगळ्या दिवशी केला जातो. उदाहरणार्थ बंगाल आणि तामिळनाडूत 14 एप्रिलला हा सण साजरा केला जातो. 

याशिवाय वेगवेगळ्या राज्यातील उगादी, नव समवतसर आणि गुढी पाडवा हे सगळे सण एकाच चौकटीत मांडले जातात. प्रत्येक सणाचं वेगळेपणच त्याची ताकद असते आणि तेच हळूहळू कमी होताना दिसतं.

यावरून स्पष्ट होतं की, सणाचा धार्मिक पाया समान असला तरी त्याची ओळख आणि अभिव्यक्ती ही पूर्णपणे स्थानिक संस्कृतीनुसार बदलते. 'गुढी पाडवा' ही केवळ तारीख किंवा धार्मिक संकल्पना नाही. ती महाराष्ट्राने दिलेली एक सांस्कृतिक ओळख आहे.

म्हणूनच, या सणाला हिंदू सण म्हणून संबोधणं हे अपूर्ण वाटतं. कारण ते त्याच्या मराठी वैशिष्ट्यांना आणि स्थानिक परंपरांना दुय्यम ठरवतं. सर्व हिंदू हा दिवस साजरा करतात, पण तो 'गुढी पाडवा' म्हणून नाही. ती ओळख फक्त महाराष्ट्राची आहे.

शेवटी, प्रश्न सणाच्या नावाचा नाही, तर त्याच्या ओळखीचा आहे. गुढी पाडवा हा केवळ धार्मिक नाही, तर मराठी संस्कृतीचा उत्सव आहे आणि त्याची ही बहुपदरी ओळख जपणं हीच खरी जबाबदारी आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा