
नवी मुंबईमध्ये (navi mumbai) 'जनगणना 2027' च्या तयारीला सुरुवात झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने (nmmc) नागरिकांना या देशव्यापी प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी (participation) होण्याचे आवाहन केले आहे.
जनगणना 2027 ही भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना ठरणार आहे. माहितीची (details) अचूकता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता अधिक सुनिश्चित करणे, हे या जनगणनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या प्रक्रियेचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे 'स्व-गणना' (Self-enumeration) सुविधा ज्याद्वारे नागरिक आपली माहिती ऑनलाइन सादर करू शकतात.
नागरिक 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपले तपशील भरू शकतात.
ही प्रक्रिया घर, कार्यालय किंवा कोणत्याही सोयीस्कर ठिकाणाहून मोबाईल फोन अथवा संगणकाचा वापर करून पूर्ण करता येते.
तथापि, प्रत्येक कुटुंबातील (family) केवळ एकाच सदस्याला नोंदणी करून ही स्व-गणनेची प्रक्रिया पूर्ण करता येईल.
ही प्रक्रिया अत्यंत सोपी, जलद आणि सुरक्षित असल्याचे प्रशासनाने अधोरेखित केले आहे. तसेच प्रशासनाने नागरिकांनी यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
**स्व-गणनेमध्ये द्यावयाची माहिती**
प्रश्नावलीची विभागणी प्रामुख्याने चार मुख्य विभागांमध्ये करण्यात आली आहे:
**1. घराची स्थिती (Housing Conditions)**
* जमीन (फरशी), भिंती आणि छतासाठी वापरलेले बांधकाम साहित्य
* घराची सद्यस्थिती
**2. कुटुंबाचे तपशील (Household Details)**
* घरात राहणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या
* कुटुंबप्रमुखाचे नाव आणि लिंग
* सामाजिक प्रवर्ग (SC/ST/इतर - लागू असल्यास)
* घराच्या मालकीची स्थिती
* घरातील राहण्याच्या खोल्यांची संख्या
* कुटुंबातील विवाहित जोडप्यांची संख्या
**3. उपलब्ध सुविधा (Amenities Available)**
* पिण्याच्या पाण्याचा स्रोत आणि उपलब्धता
* प्रकाशाचा मुख्य स्रोत
* शौचालयाची उपलब्धता आणि प्रकार
* पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था (ड्रेनेज सिस्टम)
* स्नानगृहाची (बाथरूमची) उपलब्धता
* स्वयंपाकघरातील सुविधा आणि LPG/PNG जोडणी
* स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मुख्य इंधन
**4. मालमत्ता आणि इतर माहिती (Assets & Other Information)**
* रेडिओ, दूरदर्शन (टीव्ही) आणि इंटरनेटची मालकी
* लॅपटॉप/संगणकाची उपलब्धता
* फोन/मोबाईल/स्मार्टफोन
* सायकल/दुचाकी/चारचाकी वाहन
* कुटुंबाकडून आहारात वापरले जाणारे मुख्य धान्य
* मोबाईल क्रमांक (केवळ जनगणनेशी संबंधित संपर्कासाठी)
नागरिकांनी या डिजिटल प्रणालीचा लाभ घ्यावा आणि भविष्यातील नियोजन व विकासासाठी आवश्यक असलेला अचूक राष्ट्रीय डेटा तयार करण्याच्या कार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
हेही वाचा
