मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) कडून ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यान उभारण्यात येणाऱ्या भुयारी बोगद्याच्या (टनल) प्रकल्पात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. सुरुवातीला हा बोगदा वानखेडे स्टेडियमजवळ संपणार होता. मात्र आता तो गिरगाव चौपाटी येथील पीएम हिंदू स्विमिंग बाथ अँड बोट क्लब (मफतलाल स्विमिंग पूल) परिसरापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
या विस्ताराचा प्रस्ताव महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (MCZMA) कडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला. लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. या 7,500 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला 2024 मध्ये MCZMA कडून मंजुरी मिळाली होती. मात्र आता बदललेल्या आराखड्यासाठी नव्याने परवानगी आवश्यक आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार बोगद्याचा शेवटचा टप्पा उत्तर दिशेला वाढवण्यात येत आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे मरीन ड्राईव्हवरील ‘क्वीन्स नेकलेस’ परिसरातील वाहतूक कोंडी टाळणे. सध्याच्या आराखड्यानुसार बोगद्याच्या बाहेर पडणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
हा बोगदा मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावरील ऑरेंज गेटपासून पश्चिमेकडील गिरगाव चौपाटीपर्यंत जोडला जाणार आहे. त्यामुळे पूर्व-पश्चिम दळणवळण मोठ्या प्रमाणात सुधारेल. विशेष म्हणजे, आऑरेंज गेट ते गिरगाव चौपाटी हा प्रवास सध्या 45 मिनिटांचा असून तो अवघ्या 5 मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पामुळे ईस्टर्न फ्रीवे, अटल सेतू आणि कोस्टल रोड यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारेल, तसेच एस. व्ही. पटेल रोडवरील वाहतूक कोंडीही कमी होईल. शिवाय, हा प्रकल्प सिवरी-वर्ली आणि वर्ली-बांद्रा दरम्यानच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
दरम्यान, या प्रकल्पासाठी लार्सन अँड टुब्रो कंपनीकडून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीकडून सागरी परिणामांचा अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये पाण्याचा प्रवाह, गाळ साचणे आणि किनारपट्टीवरील बदल यांचा सखोल अभ्यास करून आवश्यक उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.
प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात मरीन ड्राईव्ह परिसरात सहा अतिरिक्त लेन (प्रत्येक दिशेला तीन) आणि प्रोमेनेड विस्ताराचा विचार केला जाणार आहे. मात्र यासाठी अजून वाहतूक अभ्यास आणि आवश्यक परवानग्या घ्याव्या लागणार आहेत.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुकर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा