हप्तेखोरी थांबवा, नाहीतर मनसेचा पुन्हा मोर्चा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मनसेचे नेते आणि रेल्वे महाव्यवस्थापक यांच्यात मंगळवारी दुपारी झालेल्या बैठकीत ३० ऑक्टोबरपर्यंत हद्दीचा वाद सोडवण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने मनसेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना ही वादळापूर्वीची शांतता आहे. रेल्वे परिसरातील हप्तेखोरी थांबली नाही, तर पुन्हा मनसेच्या संतप्त मोर्चाचा सामना करावा लागेल, असा इशारा या शिष्टमंडळाने रेल्वे प्रशासनाला दिला.

'यांच्या'सोबत बैठक

मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, सरचिटणीस संदीप देशपांडे, महिला अध्यक्षा रिटा गुप्ता आदींच्या शिष्टमंडळाने मध्य व पश्चिम रेल्वेच्या दोन्ही महाव्यवस्थापकांसोबत मंगळवारी रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्यासंदर्भात चर्चा केली.

काय मागण्या?

रेल्वे परिसरातली हप्तेखोरी थांबवा, अन्यथा यापुढे येणारा मनसेचा मोर्चा तप्त मोर्चा असेल, असा इशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आल्याचं मनसे नेते नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. आम्ही सनदशीर मार्गाने कारवाईची मागणी करत आहोत. त्यामुळे तुम्हाला ही शांतता वाटत असली, तरी ही वादळापूर्वीची शांतता असल्याचं त्यांनी सांगितलं.

महिनाअखेरपर्यंत हद्द

येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत पश्चिम आणि मध्य रेल्वेची स्थानके परिसर आणि महापालिका यांच्यातली हद्द ठरवली जाणार आहे. त्यामुळे निश्चित केलेल्या हद्दीत कारवाई करण्याची जबाबदारी संबंधीत यंत्रणेची असेल, असंही त्यांनी सांगितलं.

फेरीवाल्याविरोधात सुरु असलेल्या मनसेच्या आंदोलनाबाबत पुढील दिशा पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच जाहीर करतील, असंही नांदगावकर, सरदेसाई यांनी स्पष्ट केलं.


हेही वाचा -

नगरसेवक वाद: मनसेनंतर शिवसेनेनेही मागितली सुनावणी


पुढील बातमी
इतर बातम्या