Cyclone Tauktae: मुंबईला अतिवृष्टीचा इशारा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सध्या अरबी समुद्रात घोंगावत असलेलं चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून हे वादळ पुढे गुजरातच्या दिशेने सरकणार आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीतील यंत्रणांना सर्तक झाल्या आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय, सध्या सर्वत्र कोरोनाचं सावट असल्यामुळे रुग्णांची देखील काळजी घेतली जात आहे.

दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेलं चक्रीवादळ तौते गुजरातच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. शनिवारी संध्याकाळी ताशी ३० ते ४० किलोमीटरनं वादळ पुढे सरकत होतं. हवामाना विभागाच्या ताज्या माहितीप्रमाणे हे वादळ सध्या मुंबईच्या दक्षिणेला ४९० किमी अंतरावर असून, १८ मे रोजी ते गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे.

हे चक्रीवादळ गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरून जाणार असल्यानं राज्यात अनेक जिल्ह्याला तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, प्रशासन सज्ज झालं आहे. मुंबईतील जम्बो कोविड सेंटरमधील ५८० रुग्णांना रात्रीतूनच सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे चक्रीवादळाच्या आगमनाआधीच राज्यातील काही जिल्ह्यात वाऱ्याच्या वेग वाढला आहे. तर काही ठिकाणी पावसालाही सुरूवात झाली आहे.

शनिवारी रात्री मुंबईत पाऊस झाला. तिकडे कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांना लागून असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वारे आणि पावसामुळे नुकसान झालं आहे. इचलकरंजीत शनिवारी रात्री पावसाला सुरूवात झाली. तर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांमध्ये घरांची पडझड झाली आहे. वारे आणि पावसामुळे पिकांचंही नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

चक्रीवादळाचा मार्ग

तौते चक्रीवादळ १६ मे रोजी अतितीव्र स्वरूप धारण करणार आहे. त्यामुळे समुद्रात वाऱ्यांचा वेग ताशी १२५ ते १७५ किलोमीटर असेल. १६ ते १८ मे या कालावधीत ते अतितीव्रच राहणार असून, याच काळात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळून जाणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या संभाव्य मार्गानुसार चक्रीवादळ १८ मे रोजी दुपारी किंवा संध्याकाळी गुजरातच्या पोरबंदरजवळ धडकून पुढे जाईल. त्यानंतर त्याचा वेग आणि प्रभाव कमी होईल. मात्र, त्यामुळे गुजरातमध्ये त्याचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता आहे.


हेही वाचा - 

‘तौत्के’ चक्रीवादळ; कोरोना रुग्णालयांतील ३९५ रुग्णांचे स्थलांतर

राज्यात ३४ हजार कोरोनाचे नवे रुग्ण


पुढील बातमी
इतर बातम्या