गेल्या वर्षी कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगा माणगावजवळ तब्बल तीन किलोमीटरपर्यंत लागल्या होत्या. परतीच्या प्रवासात माणगाव परिसरातील कोंडी सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाढली होती. त्यामुळे अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरासाठी वाहनचालकांना जवळपास एक तास लागला होता.
यंदा महामार्गावर ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होईल, त्यानुसार वाहनांना पर्यायी मार्गावर वळवण्यात येणार आहे.
तरणखोप–पेण बायपास–गागोडे–वरसई–पाली फाटा मार्गे वाकणकडे जाता येईल.
पोयनाड–पेझारी–कुईस–नागोठणे मार्गे वाकणकडे वाहतूक वळवण्यात येईल.
वेलशेत–वरवटणे–भिसेखिंड मार्गे वाकणकडे किंवा रोहा मार्गे कोलाडकडे जाता येईल.
पाली–नांदगाव–सुतारवाडी मार्गे कोलाड किंवा निजामपूरमार्गे माणगावकडे जाता येईल.
कोलाड–सुतारवाडी–निजामपूर–माणगाव हा पर्यायी मार्ग वापरता येईल.
मोर्बा नाका आणि गोरेगावमार्गे लोणेरेकडे वाहतूक वळवली जाईल.
गोरेगाव–आंबेत–महाड मार्गाचा वापर करता येईल.
टोल फाटा आणि विन्हे मार्गे खेडकडे जाता येईल.
नागोठणे परिसरातही वाहनांच्या प्रकारानुसार वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. कोकणाकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांना कामत हॉटेल ते रुची हॉटेलदरम्यानच्या उड्डाणपुलाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर अवजड वाहनांना सर्व्हिस रोडवरून मार्गक्रमण करण्यास सांगण्यात आले आहे.
माणगावमध्येही प्रवाशांसाठी पर्यायी बसस्थानक आणि सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात एसटी बस माणगाव बसस्थानकात प्रवेश करणार नाहीत. बसस्थानकाच्या समोरच बस थांबवण्यात येतील आणि प्रवाशांना तेथूनच बसमध्ये चढता-उतरता येणार आहे.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महामार्गाचे काम इतका काळ रखडल्याबद्दल आपण ‘लज्जित’ असल्याचे गडकरी यांनी म्हटले.
महामार्गाचे सुमारे 90 ते 95 टक्के काम पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ऑक्टोबरमध्ये मुंबई ते गोवा रस्त्याने प्रवास करून महामार्गाच्या कामाची पाहणी करणार असल्याचे गडकरी यांनी जाहीर केले आहे. प्रवाशांचा प्रवास किती सोयीचा झाला आहे, याचाही ते प्रत्यक्ष आढावा घेणार आहेत.
हेही वाचा