
परिवहन विभागाने मोटार वाहन कायद्यानुसार हे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार 16 टन किंवा त्यापेक्षा अधिक वजन क्षमता असलेले मल्टी-अॅक्सल ट्रक, ट्रेलर आणि अवजड मालवाहू वाहनांना ठराविक कालावधीत महामार्गावर प्रवेश करता येणार नाही.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अतिरिक्त एसटी बस, खासगी वाहने आणि इतर प्रवासी वाहनांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यात वाळू, खडी आणि इतर जड माल वाहून नेणाऱ्या वाहनांची भर पडल्याने वाहतूक आणखी विस्कळीत होते.
ही परिस्थिती टाळण्यासाठी सरकारने चार टप्प्यांत अवजड वाहनांवर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिला टप्पा – गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याचा काळ
11 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून 15 सप्टेंबर रात्री 11 वाजेपर्यंत निर्बंध लागू राहतील.
दुसरा टप्पा – पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन
18 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी असेल.
तिसरा टप्पा – गौरी-गणपती विसर्जन
19 सप्टेंबर सकाळी 8 वाजल्यापासून 20 सप्टेंबर रात्री 11 वाजेपर्यंत निर्बंध लागू राहतील.
चौथा टप्पा – अनंत चतुर्दशी
25 सप्टेंबर सकाळी 8 वाजल्यापासून 26 सप्टेंबर रात्री 8 वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी असेल.
जीवनावश्यक वस्तू आणि आपत्कालीन सेवा प्रभावित होऊ नयेत, यासाठी काही वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
यामध्ये दूध, पेट्रोल, डिझेल, घरगुती LPG सिलिंडर, औषधे, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर नाशवंत जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने यांचा समावेश आहे.
तसेच रुग्णवाहिका, पोलिस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि इतर आपत्कालीन सेवांची वाहने या निर्बंधातून मुक्त असतील.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरण आणि दुरुस्तीच्या कामासाठी आवश्यक साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनांनाही काही अटींसह परवानगी दिली जाणार आहे. मात्र, अशा वाहनांकडे वाहतूक पोलीस किंवा महामार्ग पोलिसांचा प्रवेश पास असणे आवश्यक आहे.
स्थानिक वाहतुकीची परिस्थिती लक्षात घेऊन नवी मुंबईचे पोलीस आयुक्त तसेच संबंधित जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक आवश्यकतेनुसार सशर्त सूट देऊ शकतील.
या निर्णयामुळे गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या आणि विसर्जनानंतर मुंबईकडे परतणाऱ्या लाखो भाविकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा
