
मुंबईतील 10 टक्के पाणी कपात तूर्तास कायम राहणार आहे. पाणी कपात मागे घेण्याची मागणी बुधवारी बीएमसीच्या स्थायी समितीच्या बैठकीत पक्षभेद विसरून नगरसेवकांनी केली. मात्र, सप्टेंबरमध्ये पावसाने ओढ दिल्यास पाणीसाठ्यावर ताण येण्याची शक्यता असल्याचे सांगत प्रशासनाने कपात मागे घेण्यास नकार दिला आहे.
ऑक्टोबरमध्ये चार ते पाच दिवस चांगला पाऊस झाल्यास पाणीसाठा वाढण्याची शक्यता असून, त्यानंतर कपातीबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
मुंबईतील पाणीटंचाई, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, जुन्या जलवाहिन्या, मोठ्या प्रमाणातील गळती आणि पाणीचोरीच्या मुद्द्यावरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाणी कपात सुरू असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोपही करण्यात आला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या श्रद्धा जाधव यांनी पाणी कपात नेमकी कधी मागे घेतली जाणार, असा सवाल केला. भाजपचे नगरसेवक शिवकुमार झा यांनी गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईकरांवर ‘पाणी आणीबाणी’ लादल्याचा आरोप केला.
मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनीही पाणीपुरवठ्याच्या समस्यांवरून प्रशासनावर टीका केली. पाण्याच्या समस्यांसाठी नागरिक प्रशासनाऐवजी लोकप्रतिनिधींना जाब विचारतात, असे त्यांनी सांगितले. मुंबईतील ब्रिटिशकालीन जुन्या जलवाहिन्या आणि झोपडपट्टी परिसरातील अपुरा पाणीपुरवठ्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
एआयएमआयएमचे गटनेते झमीर कुरेशी यांनी दररोज तब्बल 50 कोटी लिटर पाणी गळतीमुळे वाया जात असल्याचा दावा केला. शिवसेना (शिंदे)च्या अंजली नाईक यांनी चेंबूर-गोवंडीतील डोंगराळ भागात अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला.
तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या दीपमाळ बढे यांनी मुलुंडमध्ये 24 तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन देण्यात आले असतानाही भांडुपसह अनेक भागांत पाणीटंचाई कायम असल्याचे सांगितले.
काँग्रेसच्या अंजता यादव यांनी मुंबईतील विहिरींचे गाळ काढून त्यातील पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी वापरण्याची सूचना केली. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या यंत्रणेवरील ताण कमी होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
पाणी कपातीचा निर्णय योग्य असल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण
अतिरिक्त महापालिका आयुक्त विनोद शर्मा यांनी मुंबईतील तलावांमध्ये सध्या 96 टक्के पाणीसाठा असल्याचे सांगितले. मात्र, अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नसल्याने सप्टेंबरमध्येही पावसाने ओढ दिल्यास उपलब्ध पाणीसाठ्यावर ताण येऊ शकतो. त्यामुळे पाणीसाठा जपून आणि काटकसरीने वापरणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील सुमारे 6,500 किलोमीटरच्या जलवाहिनी जाळ्यापैकी 5,500 किलोमीटर जलवाहिन्यांचे मॅपिंग करण्यात येत असून, कुठल्या जलवाहिन्या बदलण्याची गरज आहे हे निश्चित केले जात आहे. तसेच विहिरी, झरे आणि इतर नैसर्गिक जलस्रोतांचा वापर करण्याच्या शक्यतांचाही अभ्यास सुरू आहे.
सप्टेंबर महिन्यानंतर तलावांतील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. मुंबईची पाणी सुरक्षा मजबूत करण्यासाठी विहिरी आणि इतर जलसाठ्यांचा वापर वाढवण्याची गरज स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनीही व्यक्त केली.
बीएमसीने 15 मेपासून मुंबईत 10 टक्के पाणी कपात लागू केली आहे.
हेही वाचा
