
केंद्र सरकारच्या Centre for Railway Information Systems म्हणजेच CRIS ने यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, प्रवासासाठी प्रवाशाचा फोटो आणि वाचता येणारा QR कोड असलेले तिकीटच वैध प्रवास दस्तऐवज मानले जाणार आहे.
केवळ RailOne अॅपमधील इनव्हॉइस, बुकिंग रिसीट किंवा UTS पेपर तिकिटाची कॉपी दाखवून प्रवास करता येणार नाही.
रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर 2 सप्टेंबरपासून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. नोंदणीकृत वापरकर्ता स्वतःसाठी एक आणि कुटुंबीय किंवा इतर व्यक्तींसाठी आणखी पाच सीझन तिकिटे बुक करू शकतो.
मुंबई उपनगरीय रेल्वे क्षेत्रासाठी अनेक तिकिटे बुक करण्याची सध्याची सुविधा कायम राहणार आहे.
स्वतःसाठी बुक केलेल्या तिकिटाची वैधता जिओ-फेन्सिंग पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवसापासून सुरू होईल. मात्र दुसऱ्या व्यक्तीसाठी बुक केलेल्या सीझन तिकिटाची वैधता बुकिंगच्या पुढील दिवसापासून सुरू होणार आहे.
स्वतःसाठी तिकीट बुक करण्यासाठी किमान वय 18 वर्षे, तर ज्याच्या नावावर तिकीट बुक केले जाणार आहे, त्या लाभार्थ्याचे किमान वय 5 वर्षे असणे आवश्यक आहे.
Shareable season ticket मोबाईलवरील PDF स्वरूपात किंवा प्रिंटेड कॉपीमध्ये ठेवता येणार आहे. मात्र त्यावर तिकिटाची वैध माहिती आणि प्रवाशाचा फोटो स्पष्ट दिसणे आवश्यक आहे. ही माहिती QR कोडमध्येही एम्बेड केलेली असेल.
QR कोड हा तिकीट पडताळणीचा मुख्य आधार असणार आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान तिकीट आणि QR कोड स्पष्ट, अखंड आणि वाचता येण्याजोगा ठेवणे आवश्यक आहे.
QR कोड खराब, बदललेला, अस्पष्ट किंवा त्यात छेडछाड झालेली आढळल्यास तिकीटाची सत्यता पडताळता येणार नाही. अशा प्रवाशाला वैध तिकीट नसलेला प्रवासी मानून रेल्वेच्या नियमानुसार दंड होऊ शकतो.
तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना नव्या प्रक्रियेनुसार प्रशिक्षण देण्याच्या सूचना CRIS ने झोनल रेल्वेला दिल्या आहेत.
TTE किंवा इतर तपासणी कर्मचारी आधी तिकिटावरील प्रवाशाचा फोटो प्रत्यक्ष व्यक्तीशी जुळवून पाहतील. गरज भासल्यास QR कोड स्कॅन करून त्यामध्ये असलेला फोटो आणि प्रवाशाची माहिती तिकिटावरील माहितीसोबत तपासली जाईल.
यासाठी तिकीट तपासणी कर्मचारी, स्टेशन स्टाफ आणि चेकिंग स्क्वॉडला QR कोड स्कॅनिंगची सुविधा असलेले अपडेटेड Hand Held Terminals म्हणजेच HHTs वापरावे लागणार आहेत.
RailOne मुळे कुटुंबीयांसाठी सीझन तिकीट बुक करणे सोपे होणार असले, तरी प्रवास करताना फोटो आणि QR कोड असलेले वैध तिकीट जवळ ठेवणे अत्यावश्यक असणार आहे.
हेही वाचा
