
मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहात मॅरेथॉनच्या नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपस्थित होत्या.
टाटा मुंबई मॅरेथॉन ही केवळ क्रीडा स्पर्धा राहिलेली नसून, मुंबईची ओळख आणि महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीचा महत्त्वाचा भाग बनली असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
2004 मध्ये सुरू झालेल्या या मॅरेथॉनमध्ये देश-विदेशातील हजारो धावपटू सहभागी होत असतात. या माध्यमातून नागरिकांमध्ये फिटनेस आणि निरोगी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करण्यासही मदत होत आहे.
यंदाच्या मॅरेथॉनमुळे राज्याला सुमारे 650 कोटी रुपयांचा आर्थिक फायदा होण्याची अपेक्षा आहे. पर्यटन, प्रवास, फिटनेस, क्रीडा साहित्य आणि तंत्रज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांनाही या स्पर्धेचा फायदा होतो.
‘फिट महाराष्ट्र, स्ट्राँग महाराष्ट्र’ हा संदेश पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांची महत्त्वाची भूमिका असल्याचेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनीही टाटा मुंबई मॅरेथॉनमुळे मुंबईला जागतिक क्रीडा नकाशावर स्थान मिळाले असल्याचे म्हटले. मुंबईकर, प्रशासन, महापालिका आणि पोलीस यंत्रणा यांना एकत्र आणणारा हा मोठा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.
म्हणजेच, मुंबई पुन्हा एकदा धावण्यासाठी सज्ज झाली असून, 17 जानेवारी 2027 रोजी टाटा मुंबई मॅरेथॉनचे 22वे पर्व रंगणार आहे.
हेही वाचा
