
गणेशोत्सव 2026 च्या पार्श्वभूमीवर वसई-विरार आणि मीरा-भाईंदरमध्ये गणेशोत्सवाच्या सुरक्षित आणि सुरळीत आयोजनासाठी प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. विशेषतः गणेशमूर्ती विसर्जनाच्या काळात गर्दी, वाहतूक कोंडी आणि दुर्घटना टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी 5 सप्टेंबर रोजी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र देऊन गणेश मंडळांना विशेष सुविधा आणि प्रशासकीय मदत देण्याची मागणी केली होती.
या मागणीनंतर VVCMCकडून गणेशोत्सवासाठी विविध व्यवस्था जाहीर करण्यात आल्या आहेत.
गणेश मंडळांना परवानग्या, वाहतूक व्यवस्थापन आणि इतर प्रशासकीय अडचणींसाठी मदत मिळावी यासाठी विशेष Disaster Management Office सुरू करण्यात येणार आहे.
तसेच नागरिक आणि गणेश मंडळांसाठी 18002673898 आणि 18002334353 हे दोन टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तक्रारी आणि मदतीच्या विनंत्यांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी विविध ठिकाणी नोडल अधिकारी आणि महापालिका कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनावेळी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन Roll-on/Roll-off म्हणजेच Ro-Ro Jettyची सुविधा उपलब्ध करून देण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड आणि पोलिसांच्या समन्वयाने ही व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या मूर्तींचे विसर्जन अधिक सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने करता येणार असून पारंपरिक विसर्जन घाटांवरील गर्दी आणि वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, मीरा-भाईंदर महानगरपालिकेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी 24 ठिकाणे निश्चित केली आहेत. यामध्ये 5 नैसर्गिक जलस्रोत आणि 19 कृत्रिम विसर्जन तलावांचा समावेश आहे.
घरगुती गणेशमूर्तींसह मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचेही सुरक्षित विसर्जन करता यावे, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.
विसर्जनाच्या ठिकाणी भाविकांना पाण्यात उतरण्यास परवानगी दिली जाणार नाही. प्रशिक्षित कर्मचारी मूर्तींचे विसर्जन करतील. त्यामुळे बुडण्यासारख्या दुर्घटना टाळण्यास मदत होणार आहे.
विसर्जन स्थळांवर पोलिस, वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिकाही तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रोत्साहन देत कृत्रिम विसर्जन तलावांचा वापर करण्याचे आवाहन नागरिक आणि गणेश मंडळांना करण्यात आले आहे.
सुरक्षितता, वाहतूक व्यवस्थापन, आपत्कालीन मदत आणि पर्यावरणपूरक विसर्जन यावर यंदा वसई-विरार आणि मीरा-भाईंदर प्रशासनाचा विशेष भर आहे.
हेही वाचा
