गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तींच्या स्वरूपावरून आता वाद निर्माण झाला आहे. फिल्मी पात्र, सेलिब्रिटी किंवा प्रसिद्ध व्यक्तींच्या रूपातील गणेशमूर्ती बनवण्याला भाजप युवा मोर्चाने आक्षेप घेतला आहे. आगामी गणेशोत्सवात अशा मूर्ती तयार करू नयेत, तसेच त्यांची विक्री किंवा प्रदर्शन करू नये, असा इशारा मूर्तिकार आणि विक्रेत्यांना देण्यात आला आहे.
गणेशमूर्ती बनवताना कलात्मक प्रयोग केले जात असले, तरी भगवान गणेशांना चित्रपटातील पात्र किंवा प्रसिद्ध व्यक्तींच्या रूपात दाखवणे हे धार्मिक भावनांचा अवमान करणारे असल्याचे भाजप युवा मोर्चाचे म्हणणे आहे.
ठाणे जिल्ह्यातील मूर्तिकार आणि मूर्ती विक्रेत्यांना अशा प्रकारच्या मूर्तींची विक्री न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच एखाद्या स्टॉलवर आक्षेपार्ह किंवा विकृत स्वरूपातील मूर्ती आढळल्यास ती तेथून हटवून परत करावी किंवा सन्मानपूर्वक विसर्जित करावी, असे संघटनेने म्हटले आहे.
अशा मूर्ती स्टॉलवर आढळल्यास भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते संबंधित ठिकाणी जाऊन स्वतः त्या मूर्तींचे विसर्जन करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, गणेशमूर्तींचे असे स्वरूप तयार करण्याची जबाबदारी मूर्तिकारांची की त्या मूर्तींची मागणी करणाऱ्या ग्राहकांची, असा सवालही युवा मोर्चाने उपस्थित केला आहे. मूर्तिकारांनी गणेशमूर्ती तयार करताना धार्मिक भावना आणि श्रद्धेचा विचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा
