
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात MMRCLच्या मेट्रो-3 अर्थात Aqua Lineवर 18 इंच म्हणजेच 45 सेंटीमीटरपर्यंत उंचीच्या गणेशमूर्तींना परवानगी देण्यात आली आहे. मूर्तीची उंची तळापासून सर्वात वरच्या बिंदूपर्यंत मोजली जाणार आहे.
कफ परेड ते आरे-JVLR दरम्यान धावणाऱ्या मेट्रो-3च्या स्थानकांवर गणेशमूर्ती घेऊन प्रवास करण्याबाबत काय करावे आणि काय करू नये, यासंदर्भात सूचना लावण्यात आल्या आहेत.
दरम्यान, MMMOCLकडून चालवण्यात येणाऱ्या मेट्रो मार्गांवर मात्र 3 फूट उंचीपर्यंतच्या गणेशमूर्तींना परवानगी देण्यात आली आहे.
यामध्ये—
मेट्रो 2A – दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम
मेट्रो 2B – मानखुर्द ते चेंबूर
मेट्रो 7 – दहिसर पूर्व ते गुंदवली
मेट्रो 9 – दहिसर पूर्व ते काशिगाव
या मार्गांचा समावेश आहे.
म्हणजेच मेट्रो-3वर 18 इंचांची मर्यादा, तर मेट्रो 2A, 2B, 7 आणि 9वर 3 फुटांपर्यंतच्या मूर्तींना परवानगी असणार आहे.
दरम्यान, वर्सोवा-अंधेरी-घाटकोपरदरम्यान धावणाऱ्या मेट्रो-1वरही गणेशमूर्ती घेऊन प्रवास करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचं ऑपरेटरकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, मूर्तीच्या उंचीची मर्यादा अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.
भाविकांनी गणेशमूर्ती नेताना इतर प्रवाशांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तसेच ज्वलनशील किंवा स्फोटक पदार्थ, धोकादायक वस्तू, घातक साहित्य आणि इतर प्रतिबंधित वस्तू मेट्रोत नेण्यास पूर्णपणे मनाई असेल.
त्यामुळे गणेशमूर्ती घेऊन मेट्रोने प्रवास करण्याचा विचार असेल, तर आपण कोणत्या मेट्रो मार्गावरून प्रवास करणार आहोत आणि त्या मार्गावर मूर्तीच्या आकाराची किती मर्यादा आहे, हे आधी तपासणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा
