
या मंडळाच्या माध्यमातून राज्यातील चालक-मालक आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, विमा, आरोग्य सुविधा आणि शैक्षणिक मदत देण्यात येणार आहे.
या योजनेतील महत्त्वाची घोषणा म्हणजे ‘सेवानिवृत्ती सन्मान योजना’.
65 वर्षे पूर्ण केलेल्या पात्र चालक-मालकांना ₹10 हजारांचं मानधन दिलं जाणार आहे.
ज्या सुमारे 735 पात्र चालकांनी बँक खात्याची माहिती दिली आहे, त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने मदत दिली जाणार आहे.
कल्याण मंडळाच्या माध्यमातून चालकांना विविध सामाजिक सुरक्षा सुविधा मिळणार आहेत.
यामध्ये
ड्युटीवर असताना जीवन विमा आणि अपंगत्व संरक्षण
आरोग्यविषयक आर्थिक मदत
कामाच्या ठिकाणी दुखापत झाल्यास आर्थिक सहाय्य
चालक काम करू शकत नसताना कुटुंबाला सामाजिक सुरक्षा
यांचा समावेश आहे.
चालक-मालकांच्या मुलांसाठीही सरकारने शिष्यवृत्तीची घोषणा केली आहे.
दहावीमध्ये 75 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ₹5 हजार, तर बारावीमध्ये 75 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांना ₹7 हजारांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
तसंच पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही शैक्षणिक कामगिरीच्या आधारे अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाणार आहे.
या कल्याण मंडळाला धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव देण्यात आलं आहे.
ठाण्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढवण्यात आनंद दिघे यांची महत्त्वाची भूमिका होती. एकनाथ शिंदे यांचे ते राजकीय गुरू आणि मार्गदर्शक मानले जातात.
त्यामुळे या मंडळाला आनंद दिघे यांचं नाव देण्याला विशेष राजकीय आणि सामाजिक महत्त्व आहे.
या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी कोरोना काळात ऑटो आणि टॅक्सी चालकांनी बजावलेल्या भूमिकेचाही उल्लेख केला.
भीतीचं वातावरण असतानाही अनेक चालकांनी काम सुरू ठेवलं आणि रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली, असं शिंदे यांनी सांगितलं.
ठाण्यातील ‘पिंक रिक्षा’ उपक्रमाचाही त्यांनी उल्लेख केला. या माध्यमातून महिलांना सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात रोजगाराच्या संधी मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं.
सेवानिवृत्तीपासून विमा, आरोग्य आणि मुलांच्या शिक्षणापर्यंत चालक-मालकांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आर्थिक आधार देण्याचा सरकारचा प्रयत्न या नव्या कल्याण मंडळाच्या माध्यमातून केला जाणार आहे.
हेही वाचा
