Advertisement

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील पहिली 10 हजार घरं कधी तयार होणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील पहिली 10 हजार घरं कधी तयार होणार?
SHARES

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 10 हजार पुनर्वसन घरं 2029च्या सुरुवातीपर्यंत तयार होतील, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

NAREDCOच्या Real Estate & Infrastructure Investors’ Summit 2026 मध्ये विकासकांना संबोधित करताना फडणवीस यांनी ही माहिती दिली.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी आपल्याला आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र, आपण भूमिपूजन करण्यास नकार देत पहिल्यांदा पुनर्वसनाची घरं तयार झाली पाहिजेत, असं स्पष्ट केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

2029मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते घरांचा ताबा?

फडणवीस म्हणाले की, पहिल्या 10 हजार घरांचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधानांना आमंत्रित करून धारावीतील रहिवाशांना या घरांचा ताबा देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याची इच्छा आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन 12 सप्टेंबर 2024 रोजी माटुंगा येथील रेल्वे ग्राउंडवर साध्या पद्धतीने करण्यात आलं होतं.

621 एकर धारावीचा कायापालट

या प्रकल्पांतर्गत धारावीतील तब्बल 621 एकर परिसराचा पुनर्विकास केला जाणार आहे.

Adani Realtyचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव अदानी यांनी या प्रकल्पामुळे 10 लाखांहून अधिक लोकांच्या जीवनावर परिणाम होणार असल्याचं सांगितलं.

धारावीचा विकास करताना तेथील घरं, छोटे उद्योग, बाजारपेठा, धार्मिक स्थळं, सामाजिक संबंध आणि अनेक पिढ्यांच्या आठवणींचं जतन करण्यावर भर दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

पात्र रहिवाशांना 350 चौरस फुटांचं घर

या प्रकल्पात पात्र रहिवाशांना त्याच ठिकाणी म्हणजेच ‘इन-सिटू’ 350 चौरस फुटांचं घर देण्यात येणार आहे.

तर पात्रतेच्या निकषात न बसणाऱ्या रहिवाशांचं मुंबईतील इतर ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे.

10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचं लक्ष्य

दरम्यान, सरकारने नुकत्याच आणलेल्या झोपडपट्टी क्लस्टर पुनर्विकासाच्या पद्धतीच्या माध्यमातून मुंबईला पुढील 10 वर्षांत झोपडपट्टीमुक्त करण्याचं लक्ष्य ठेवलं असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.

“Redevelopment is the new mantra”, असं म्हणत फडणवीस यांनी मुंबईच्या भविष्यातील विकासावर भर दिला.

यासोबतच विरार-पलघर परिसरात ‘चौथी मुंबई’ उभारण्याच्या दिशेने सरकारने काम सुरू केलं आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

धारावीचा पुनर्विकास, झोपडपट्टी क्लस्टर विकास आणि विरार-पलघरमधील ‘चौथी मुंबई’—या माध्यमातून मुंबईच्या भविष्यातील शहरी रचनेत मोठे बदल करण्याची सरकारची योजना आहे.



हेही वाचा

गणेशोत्सवासाठी नवी मुंबईतील रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा