
या केंद्रात कमी दरात काही खासगी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे परिसरातील अनेक रुग्ण उपचारासाठी या केंद्रावर अवलंबून आहेत. मात्र, एक्स-रे आणि सोनोग्राफीची सुविधा बंद असल्याने रुग्णांना सायन रुग्णालयात उपचारासाठी जावं लागत आहे.
सायन रुग्णालयाचे डीन डॉ. प्रमोद इंगळे यांच्या म्हणण्यानुसार, कोविड काळात CSRच्या माध्यमातून या केंद्राला एक्स-रे मशीन देण्यात आली होती. मात्र, सध्या ही मशीन वापरण्यायोग्य राहिलेली नाही.
दररोज एक्स-रेसाठी केवळ 8 ते 10 रुग्ण येतात, त्यामुळे नवीन मशीन खरेदीवर खर्च करणं योग्य ठरणार नसल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे.
धारावीच्या 90 फूट रोडवरील स्थानिक डॉक्टर डॉ. अनिल पचनेकर यांच्या मते, या केंद्रातील काही खासगी सुविधा बाहेरील खासगी केंद्रांच्या तुलनेत स्वस्त आणि माफक दरात उपलब्ध आहेत.
त्यामुळे ते रुग्णांना या केंद्रातील सुविधा घेण्याचा सल्ला देतात. मात्र, ज्या रुग्णांना हा खर्च परवडत नाही, अशांना सायन रुग्णालयात रेफर केलं जातं.
दरम्यान, सायन रुग्णालय प्रशासन या 200 बेडच्या आरोग्य केंद्राचा नव्या पद्धतीने विकास करण्याच्या तयारीत आहे.
सध्या या केंद्राची क्षमता हळूहळू कमी केली जात असून, सायन रुग्णालयातील काही दीर्घकालीन रुग्णांना येथे हलवलं जात आहे. रुग्णालयात जास्त गर्दी झाल्यास अतिरिक्त रुग्णांनाही या केंद्रात हलवण्यात येत आहे.
या ठिकाणी भविष्यात डायलिसिस सेंटर आणि IVF सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती डॉ. प्रमोद इंगळे यांनी दिली.
सध्या सायन रुग्णालयाची क्षमता 1,900 बेडची आहे. रुग्णालयाचा विस्तार सुरू असून, भविष्यात त्याची क्षमता 3,300 बेडपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
त्यामुळे धारावीतील ‘छोटा सायन’ केंद्राचा वापरही रुग्णालयावरील वाढता ताण कमी करण्यासाठी आणि विशेष वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करण्याची योजना आहे.
हेही वाचा
